राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने मागासवर्गीय सुशिक्षित महिला उमेदवाराला संधी द्यावी – तेजस्विनी कदम
तेजस्विनी कदम यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपची देशभरात यशस्वी घौडदौड सुरु आहे. लोकसभेच्या निवडणूकीची आचारसंहिता देखील महिन्याभरात लागू होईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला ‘अबकी बार चारसो पार’ असा संकल्प केला आहे. तो नक्कीच तडीस जाईल, कारण मोदिजींची देशात लाट आहे. अशातच राज्यसभेचे सहा तर विधान परिषदेचे तब्बल २१ आमदार निवृत्त होणार आहेत. त्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणूकीची भाजपकडून तयारी सुरु आहे. त्यासाठी पक्षश्रेष्ठींनी अनु जाती जमाती/मागासवर्गीय सुशिक्षित महिला उमेदवाराला राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीसाठी संधी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या सचिव तथा भाजपा युवती पिं.चि.शहर (जिल्हा) अध्यक्षा तेजस्विनी कदम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न घेऊन राष्ट्रहितासाठी अनेक उत्तम निर्णय घेतलेले आहेत. नुकतेच लोकसभेत नारी सन्मानार्थ आरक्षण विधेयक मंजूर केले. भारत देशास विकसीत राष्ट्र घडवण्यासाठी राजकीय क्षेत्रात महिला व युवकांचे योगदान असावे, असा भाजपचा प्रयत्न आहे. फेब्रुवारी २०२४ मधे होणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षाने सुशिक्षित, महिला अनु जाती जमाती / मागास वर्गीय महिला उमेदवारांचा विचार करावा, त्यांना निवडणुकीसाठी संधी द्यावी, असे या निवेदनात तेजस्विनी कदम यांनी म्हटले आहे.