पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अनुसूचित जातींमध्ये अ.ब.क.ड. उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात भव्य मागणी निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले. निगडी येथील तहसीलदार कार्यालय व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात मातंग समाजासह विविध पोटजातींच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनात पिंपरी-चिंचवड शहरातील विविध समाजबांधव, मातंग समाजातील संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे विचार प्रबोधन पर्व आणि साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्वचे आजी-माजी अध्यक्ष, पदाधिकारी आणि आजी-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या माध्यमातून अनुसूचित जातींतील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळावा, तसेच शासकीय योजनांचा समान लाभ मिळण्यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान विविध वक्त्यांनी समाजातील प्रलंबित प्रश्न, आरक्षणातील असमतोल, शैक्षणिक व सामाजिक प्रतिनिधित्वातील तफावत यांसंदर्भात ठोस भूमिका मांडल्या. शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार उपवर्गीकरणाची प्रक्रिया तातडीने राबवावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यानंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीने अपर तहसीलदार यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार विधानपरिषद श्री अमित गणपत गोरखे यांनी केले.
या प्रसंगी भाऊसाहेब अडागळे, मारुती गणपत जाधव, युवराज भगवान दाखले, संदिपान झोंबाडे, बाबासाहेब रसाळ, नितीन घोलप, अरुण जोगदंड आणि संजय ससाने आदी उपस्थित होते.

