पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अंमली पदार्थांविरोधात निर्णायक भूमिका घेत सांगवी पोलीस स्टेशनने मोठी कारवाई करत तब्बल 70 किलो गांजा जप्त केला आहे. दौंड तालुक्यातील पाटेठाण परिसरात करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे ड्रग्स माफियामध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सांगवी पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत पाटेठाण येथे मोठ्या प्रमाणात गांज्याची साठवणूक व वाहतूक सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव भालेराव यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचत संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छापेमारीदरम्यान संशयितांकडील मालाची तपासणी केली असता सुमारे 70 किलो गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाची किंमत प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांच्या घरात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान वापरण्यात आलेली वाहने आणि इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार कोण, तसेच अंमली पदार्थांचा पुरवठा कोणत्या मार्गाने होत होता याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी हालचाली वेगात केल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या यशस्वी मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक महादेव भालेराव यांच्यासह जीपीएसआय हिंगे, एएसआय निशांत काळे, एएसआय वाघुळे, हेड कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल पाटील आणि हेड कॉन्स्टेबल धावले यांनी सक्रिय सहभाग नोंदवत कारवाई यशस्वी केली.
दरम्यान, युवासेना जिल्हा उपाध्यक्ष मेघराज प्रिया सिद्धार्थ लोखंडे यांनी सांगवी पोलीसांच्या या कामगिरीचे मनःपूर्वक अभिनंदन करत अंमली पदार्थांविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून आपल्या परिसरातील संशयास्पद हालचालींबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात कडक संदेश गेला असून अशा गुन्ह्यांना आळा बसण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

