वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -वाकड परिसरातील वाकडकर वस्ती येथे शनिवारी मध्यरात्री एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. स्थानिक रहिवासी श्री. रमेश वाकडकर यांच्या गोठ्यातील एका निरपराध वासरावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने भीषण हल्ला करत त्याचे लचके तोडले. या क्रूर हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या मते, वाकड परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वारंवार प्रशासनाला कळवूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर तीव्र झाला आहे. विशेष म्हणजे, ही पहिलीच घटना नसून सुमारे दोन वर्षांपूर्वी याच भागात एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. सुदैवाने त्या वेळी मोठा अनर्थ टळला होता.
तसेच काही दिवसांपूर्वी चाकण परिसरातही एका महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती होत असताना प्रशासनाची निष्क्रियता हा मोठा प्रश्न निर्माण करत आहे.
वाकड भागात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असून, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रभाग स्तरावर कोणतेही ठोस सर्वेक्षण किंवा नियोजन होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे काही ठोस मागण्या केल्या आहेत:
भटक्या कुत्र्यांबाबत स्वतंत्र आणि प्रभावी धोरण तातडीने राबवावे.वाकड परिसरात विशेष मोहीम राबवून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. रमेश वाकडकर यांच्या वासराच्या मृत्यूबद्दल योग्य ती नुकसानभरपाई द्यावी.नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
याबाबत स्थानिक नेते विशाल वाकडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले,“वाकड परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असून वारंवार कळवूनही प्रशासन केवळ पाहत बसले आहे. निरपराध जनावराचा बळी जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असताना तातडीने ठोस कारवाई करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. अन्यथा नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.”
नागरिकांनी इशारा दिला आहे की, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाईल.
“आता तरी प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

