पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शहर अभियंता मकरंद निकम (सिव्हिल/व्हीआरएस) यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नगरसेवक श्री. विनोद जयवंत नढे यांनी आयुक्तांकडे सविस्तर निवेदन सादर करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. निविदा प्रक्रिया, विकासकामे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.
नढे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, मकरंद निकम यांनी शहर अभियंता पदावर कार्यरत असताना घेतलेल्या अनेक तांत्रिक निर्णयांमध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो. विशेषतः निविदा प्रक्रियेत काही ठराविक कंत्राटदारांना लाभ होईल अशा अटींचा समावेश करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
याशिवाय, विविध विकासकामांच्या मोजमाप पुस्तके (Measurement Books) आणि देयक व्हाउचर्स (Payment Vouchers) यामध्ये तफावत आढळत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या निधीचा गैरवापर झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, ‘इमर्जन्सी वर्क’च्या नावाखाली नियमबाह्य पद्धतीने कामे मंजूर केल्याचा आरोप करत तांत्रिक मंजुरी (Technical Sanction) प्रक्रियेतही अनियमितता होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच आवश्यक असल्यास प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) वर्ग करावे, अशी ठाम मागणी नढे यांनी केली आहे. अन्यथा जनहित याचिका (PIL) दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

