नाशिक, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील इंदिरा युनिव्हर्सिटी आयोजित ‘इंदिरा युथ यात्रा आणि लिडरशिप अवॉर्ड २०२६’ या सोहळ्यात नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा भव्य सन्मान होणार आहे. यासह विद्यार्थ्यांना सुप्रसिद्ध सिने कलाकारांशीही थेट संवाद साधता येणार आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा सोहळा शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी ४ ते ६ या वेळेत “ताज गेटवे नाशिक” येथे होणार आहे.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रेरणादायी मार्गदर्शन तसेच नेतृत्व विकासासाठी दिशा देणे हा आहे. इंदिरा विद्यापीठाच्या अध्यक्षा तथा प्रमुख मार्गदर्शिका डॉ. तरिता शंकर यांची उपस्थिती असून त्या युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री नम्रता संभेराव हे विशेष उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधणार आहेत. अभिनय क्षेत्रातील त्यांचा प्रवास, आलेल्या अडचणी, यशाचे टप्पे आणि करिअरच्या संधी याविषयी ते अनुभव शेअर करणार आहेत.
नाशिककर विद्यार्थी व पालकांसाठी हा कार्यक्रम एक वेगळी संधी ठरणार असून, युवा पिढीला प्रेरणा आणि योग्य दिशा मिळवून देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या संवादातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासोबतच त्यांच्या करिअरविषयी नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

