पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना आज (गुरुवारी) महापालिका सेवेतून तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबतचे आदेश दिले होते. खोराटे यांना कार्यमुक्त केल्याने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झालेले सनदी अधिकारी (आयएएस) कुलदीप जंगम यांचा रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका ‘ब’ वर्गामध्ये आहे. नवीन आकृतीबंधानुसार तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरचे आणि महापालिका अधिकाऱ्यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदांची विभागणी करण्यात आली. सद्या मुख्याधिकारी संवर्गातील विजय खोराटे, तृप्ती सांडभोर आणि ग्रामविकास विभागाचे विक्रांत बगाडे अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत होते.
त्यातील खोराटे यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आला आहे. त्यांची सात जुलै २०२३ रोजी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. तिन्ही अतिरिक्त आयुक्त कार्यरत असताना राज्य शासनाने सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी बुधवारी नियुक्ती केली होती. परंतु, जंगम यांची नेमकी कोणाच्या जागी नियुक्ती झाली हे आदेशात स्पष्ट नव्हते.
तिन्ही अतिरिक्त आयुक्त कार्यरत असल्याने प्रशासनात संभ्रम निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी सकाळी महापालिकेतील तीन वर्षांचा कार्यकाळ संपत आलेले अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले आहे. राज्य शासनाने महापालिकेतील तीन अतिरिक्त आयुक्तापैंकी एक अतिरिक्त आयुक्तपद भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यासाठी सुनिश्चित केले आहे. त्यानुसार सनदी अधिकारी कुलदीप जंगम यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
जंगम यांच्या नियुक्तीमुळे खोराटे यांना नगरविकास विभागात रुजू होण्यासाठी मध्यान्हपूर्व कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झालेले सनदी अधिकारी (आयएएस) कुलदीप जंगम यांचा रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, खोराटे यांच्याकडील महत्वाचा अग्निशमन, पर्यावरण विभाग आयुक्तांनी बुधवारीच काढला होता. आता गुरुवारी सकाळी खोराटे यांना महापालिका सेवेतून कार्यमुक्त केले आहे.

