पिंपरी-चिंचवड अर्थसंकल्पावर सभागृहात जोरदार खडाजंगी; मोठे प्रकल्प थांबवा, मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याची सर्वपक्षीय मागणी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यावर भर द्यावा, मोठ्या खर्चिक प्रकल्पांना आळा घालावा आणि नागरिकांना पाणी, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन यांसारख्या सेवांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमुखाने केली.
महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत अर्थसंकल्पावर विस्तृत चर्चा झाली. भाजपचे नगरसेवक विनोद नढे यांनी चर्चेची सुरुवात करत सव्वा तास भाषण करत प्रशासनावर टीका केली. त्यांनी सांगितले की, प्रशासनाने तयार केलेल्या मूळ अर्थसंकल्पात अनेक त्रुटी होत्या, मात्र स्थायी समितीने त्यात सुधारणा करून तो लोकाभिमुख केला आहे. तसेच वाढीव दराने देण्यात आलेल्या निविदा आणि थेट खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ठेकेदारांवर कारवाईची मागणी त्यांनी केली.
भाजपचे नितीन काळजे यांनी मोठे प्रकल्प तात्पुरते स्थगित करून लहान व स्थानिक कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी भूमिका मांडली. तसेच नवीन बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देताना शहरातील पाणीटंचाईचा विचार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. बीआरटीसारख्या प्रकल्पांवर पुनर्विचार करण्याची मागणीही त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप वाघेरे यांनी ठेकेदार व राजकीय हस्तक्षेपावर टीका करत महापालिकेतील आर्थिक व्यवहार पारदर्शक करण्याची गरज व्यक्त केली. काही राजकीय नेते स्वतःच ठेकेदार असल्याचा आरोप करत त्यांनी निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद कुटे यांनी शहरातील अपुरा पाणीपुरवठा, वाढती वाहतूककोंडी आणि सल्लागारांवर होणारा कोट्यवधींचा खर्च यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’मुळे पार्किंगची समस्या वाढल्याचे त्यांनी नमूद केले. शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नवाढीच्या उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली.
या चर्चेत श्रुती डोळस, बाबा त्रिभुवन, नीलेश नेवाळे, कुशाग्र कदम, अनुराधा गोरखे, सुलभा उबाळे, नीलेश बारणे, सोनाली गव्हाणे, अर्चना सस्ते, कुंदन गायकवाड, कविता भोंगाळे, उत्तम केंदळे आदी नगरसेवकांनीही सहभाग घेत विविध मुद्द्यांवर मते मांडली.
सभागृहात गोंधळाचे वातावरण
चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. काही काळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. महापौरांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
गंभीर घटनेवर निषेध
सभेदरम्यान महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. संबंधित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, अगदी फाशीची शिक्षा देण्याची मागणी महिला नगरसेविकांनी केली. या घटनेचा निषेध म्हणून सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.
अर्थसंकल्पाच्या मंजुरीसोबतच शहरातील मूलभूत सुविधांवरील प्रश्न, पारदर्शकतेची गरज आणि राजकीय वातावरणातील तणाव यामुळे ही सभा गाजली.

