पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी चौक ते आकुर्डी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो रेलच्या बांधकामामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. मेट्रो कामादरम्यान रस्त्यावर माती व मुरुम मोठ्या प्रमाणात साचत असून, त्यावर पाणी पडल्याने चिखल तयार होत आहे. त्यामुळे वाहन चालकांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधित मेट्रो प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळी दुचाकीस्वारांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर मेट्रो अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाशीही संपर्क साधण्यात येत असून, रोड क्लिनर आणि रोड वॉशर व्हेईकल तातडीने पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित विभागांनी त्वरीत कारवाई करून रस्त्यांची स्वच्छता करणे व आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

