पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव परिसरातील रामनगर येथून CME सैन्य दलाच्या सीमेला लागून जाणाऱ्या रस्त्यावर ब्लू डार्ट ते मयूर नगरी चौक दरम्यान फूटपाथवरील झाडांची दयनीय अवस्था समोर आली आहे. पाण्याअभावी ५ ते १५ फूट उंचीपर्यंत वाढ झालेली सुमारे २५ झाडे जळून गेल्याचे निदर्शनास आले असून, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
महापालिकेकडून शहरात तब्बल ३२ लाख झाडे असल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात वाढलेली झाडेही जिवंत ठेवण्यात अपयश येत असल्याची टीका होत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त असताना झाडांची अशी नासाडी होणे चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
फुटपाथ विकसित करताना झाडांच्या बुंध्याभोवती सिमेंटचे आवरण घालण्यात आल्याने मुळांना पुरेशी जागा व पाणी मिळत नाही. परिणामी झाडांची वाढ खुंटून ती कोमेजून जळत असल्याचे स्पष्ट होत आहे. “झाडे लावा, झाडे जगवा” हा शासनाचा संदेश प्रत्यक्षात फोल ठरत असल्याचा आरोप मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केला आहे.
या घटनेनंतर महाराष्ट्र शासनाचे वृक्षमित्र अरुण पवार यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले असून, गरजेनुसार मदत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, उद्यान विभागाचे अधिकारी केवळ “माहिती घेतो, कारवाई करतो” अशी उत्तरे देत वेळ मारून नेत असल्याचा आरोप पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड यांनी केला आहे. कामचुकार अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
या संदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वाळलेल्या झाडांचे छायाचित्रे गोळा करून अधीक्षक महेश गारगोटे यांना निवेदन दिले.
या वेळी अण्णा जोगदंड, संजना करंजावणे, काळुराम लांडगे, संगीता जोगदंड, गजानन, मुरलीधर दळवी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अरविंद मांगले, जालिंदर दाते, संजय कांबळे, गणेश वाडेकर, पंडित वनस्कर, रितेश वनस्कर, महेश राऊत आदी उपस्थित होते.

