आरोग्य विभाग राबवत आहे अभिनव उपक्रम
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक पुनर्वापर दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने राबविलेला ‘वेस्ट टू आर्ट’ हा उपक्रम थेरगाव परिसरात नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.
ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. २३ मधील संजीवनी कॉर्नर येथे टाकाऊ वस्तूंमधून साकारलेल्या आकर्षक कलाकृतींनी परिसर अक्षरशः बहरून गेला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून “कमी वापर, पुनर्वापर आणि पुनर्चक्रण (आर.आर.आर.) या संकल्पनेचा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
टाकाऊ वस्तूंना नवसंजीवनी देत परिसराचे आकर्षक पद्धतीने सुशोभीकरण करण्यात आले असून, स्वच्छता आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम थेरगाव येथे आता पहायला मिळत आहे.
आर.आर.आर. सेंटर आणि ‘वेस्ट टू आर्ट’सारख्या अभिनव उपक्रमांमुळे शहरात पर्यावरणपूरक जीवनशैलीला चालना मिळत आहे. नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छतेच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला.
क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे, आरोग्य निरीक्षक गोपाल धस आणि गणेश राजगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी उपस्थित नागरिकांना ओला व सुका, घरगुती घातक, सॅनिटरी कचरा वेगळा करून पालिकेच्या घंटागाडीत देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच स्वच्छता आणि वसुंधरा संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले.
टाकाऊ वस्तूंचा सुयोग्य पुनर्वापर केल्यास परिसराचे सौंदर्य खुलते आणि स्वच्छतेच्या माध्यमातून शहर विकासाची दिशा ठरते असे मत सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी व्यक्त केल.
वेस्ट टू आर्ट’ यासारखे उपक्रम शहराच्या सौंदर्यात भर घालतात त्याचबरोबर, नागरिकांमध्ये स्वच्छता आणि वसुंधरेबाबतची जाणीव अधिक दृढ करतात. प्रत्येकाने टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून आपल्या परिसराला सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करावा.
-रवि लांडगे
महापौर
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
आपल्या कचराचे योग्य व्यवस्थापन केल्यास तो एक संसाधन ठरू शकतो. ‘वेस्ट टू आर्ट’ आणि आर.आर.आर.सारख्या अनोख्या व अभिनव उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये वसुंधरापूरक सवयी रुजण्यास त्याची मदत होत असून, स्वच्छ आणि शाश्वत पिंपरी चिंचवड शहरासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रीय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
-डॉ.विजय सूर्यवंशी
आयुक्त
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

