पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) आयुक्तपदी नियुक्त झालेले डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी यांनी आज प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला अतिरिक्त पदभाराचा कालावधी संपुष्टात आला असून महापालिकेला अखेर पूर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची ७ ऑक्टोबर २०२५ रोजी नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. त्यानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. गेल्या सुमारे पाच महिन्यांपासून ते ही जबाबदारी सांभाळत होते.
दरम्यान, आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे महापालिकेच्या प्रशासनात केवळ अत्यावश्यक कामांनाच प्राधान्य दिले जात असल्याची भावना काही पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. त्यामुळे महापालिकेचे प्रशासकीय कामकाज काही प्रमाणात संथ गतीने सुरू असल्याची नाराजीही व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर महापौर रवी लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी पूर्णवेळ आयुक्त नेमण्याची मागणी केली होती.
यानंतर राज्य शासनाने कोकण विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले वरिष्ठ आयएएस अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती केली. शासनाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला.
नियुक्तीनंतर आज महापालिका भवनात डॉ. सूर्यवंशी यांनी प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून अधिकृतपणे आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. नव्या आयुक्तांच्या नियुक्तीमुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळेल, प्रलंबित प्रकल्पांना चालना मिळेल तसेच शहर विकासाच्या विविध योजनांमध्ये वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

