पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे पिंपळे गुरव जैन श्रावक संघ आणि जय आनंद महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त ‘आदर्श माता सन्मान समारोह’ उत्साहात पार पडला. जैन स्थानकाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात समाजातील आदर्श मातांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी आमदार अश्विनी जगताप, नगरसेविका पल्लवी जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोककुमार पगारिया, जैन कॉन्फरन्स महिला शाखेच्या उपाध्यक्ष प्रा. सुरेखा कटारिया, कीर्तनकार डॉ. श्वेता राठोड, दापोडी संघाचे अध्यक्ष दिलीप भन्साळी, पिंपळे गुरव संघाचे अध्यक्ष राजेंद्रजी कर्नावट, माजी अध्यक्ष प्रा. सुरेशजी धारिवाल, डॉ. निलेश भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. श्वेता राठोड आणि प्रा. सुरेखा कटारिया यांनी ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर मार्गदर्शन करत महिलांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात शारदाबाई जवाहरलालजी भंडारी, मंगलबाई सूर्यकांत बाफना आणि अरुणाजी चंद्रकांतजी भन्साळी यांना ‘आदर्श माता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल आणि हार देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जय आनंद महिला मंडळाच्या अध्यक्षा सविताजी बाठीया यांनी केले. तर प्रा. सुरेशजी धारिवाल यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

