पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व धर्मीय नागरिकांच्या अंत्यसंस्काराचा खर्च महानगरपालिकेकडून देण्याबाबतच्या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
भाऊसाहेब भोईर यांनी ४ मार्च २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना पत्र देऊन या विषयाकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व धर्मीय व्यक्तींच्या अंत्यसंस्काराचा खर्च महानगरपालिकेमार्फत करण्याबाबत स्थायी समितीने ठराव मंजूर केला होता. स्थायी समिती ठराव क्रमांक १५५५ (दि. ०४/०४/२०२४) नुसार हा प्रस्ताव मंजूर झाला असून ३० मे २०२४ रोजी महापालिका सभेने देखील त्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी २ जुलै २०२४ रोजी या संदर्भात आदेशही काढले होते.
मात्र, आदेश जारी होऊनही या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नसल्याचे भोईर यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
भोईर यांनी पुढे म्हटले आहे की, राज्यातील इतर काही महापालिकांमध्ये – जसे नाशिक, मुंबई, चंद्रपूर व कोल्हापूर – अशा प्रकारची योजना राबविली जात असून त्याचा लाभ नागरिकांना दिला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही ही योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.
सध्या अनेक नागरिकांची आर्थिक परिस्थिती कठीण असल्याने अंत्यसंस्कारासाठी होणारा खर्च कुटुंबीयांसाठी मोठा आर्थिक ताण ठरतो. अशा परिस्थितीत महानगरपालिकेची ही योजना सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी ठरेल, असेही भोईर यांनी नमूद केले.
म्हणूनच संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना देऊन ही योजना तात्काळ कार्यान्वित करावी, अशी मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

