पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांची बदली; डॉ. अभिजित चौधरी यांची नवी नियुक्ती
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य शासनाने बुधवारी (४ मार्च) आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त योगेश म्हसे यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती मुंबईतील मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे.
२००९ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले योगेश म्हसे गेल्या काही काळापासून पीएमआरडीएचे महानगर आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात पुणे महानगर प्रदेशातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे काम करण्यात आले. तसेच शहराच्या नियोजनासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते.
दरम्यान, राज्य शासनाने २०११ बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. डॉ. चौधरी यापूर्वी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहत होते.
राज्य शासनाच्या आदेशानुसार डॉ. अभिजित चौधरी लवकरच पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार असून पुणे महानगर प्रदेशातील विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणी आणि नियोजनाला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

