पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक मोहिमेत उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याचे दर्शन घडते. शिवचरित्र संकटे दूर करत नाही, परंतु संकटांना कसे सामोरे जायचे हे शिकवते, असे प्रतिपादन शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, या अंतर्गत चिंचवड येथील संभाजीनगर येथे शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांचे ‘यशाचा नवा मंत्र – शिवतंत्र’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास माजी महापौर मंगला कदम, नगरसदस्य कुशाग्र कदम यांच्यासह महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, साई किरण मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल नारखेडे, उपाध्यक्ष अजित कोडलकर, गिरीश तेलंग, कार्याध्यक्ष संजय कलागते, खजिनदार निलेश नारखेडे, सहखजिनदार मंगेश गुंजाळ आदी उपस्थित होते. साई किरण मित्र मंडळाचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले.
डॉ. तनपुरे यांनी आपल्या व्याख्यानात वेळेचे महत्त्व विविध उदाहरणांद्वारे अधोरेखित केले. एका वर्षाचे, महिन्याचे, आठवड्याचे, दिवसाचे, तासाचे, मिनिटाचे आणि अगदी एका सेकंदाचेही जीवनातील मूल्य किती मोठे असते, हे त्यांनी प्रभावी उदाहरणांतून स्पष्ट केले. वेळेचे योग्य नियोजन आणि काटेकोर वापर केल्यास यश निश्चित मिळते, तसेच जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा गुरू असणे आवश्यक असून तोच आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देतो,माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला अधिक महत्त्व आहे,असे सांगत त्यांनी प्रत्येक कार्याची सुरुवात धाडसाने करावी व कमतरतांकडे न पाहता कृतीवर भर द्यावा. तसेच आई-वडिलांना कधीही विसरू नका, असेही सांगितले.
व्याख्यानाचा समारोप प्रेरणादायी पोवाड्याने झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले.

