पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवरायांच्या प्रशासकीय कौशल्याचा वारसा जपत जनहिताची कामे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या तहसीलदार आशा होळकर यांच्याहस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना होळकर यांनी महाराजांच्या देदीप्यमान आणि प्रेरणादायी जीवनकार्याचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, “शिवरायांचे प्रशासकीय कौशल्य आणि लोककल्याणाचे धोरण आजही तितकेच मार्गदर्शक आहे. तोच वारसा पुढे नेत ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून पुणे महानगर अधिक विकसित करण्याचा आमचा निरंतर प्रयत्न आहे.”
या कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे कक्ष अधिकारी विजय पाटील, कनिष्ठ अभियंता शशिकांत होले, माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे, ऋतुराज सोनवणे, प्रशांत चौगले, अविनाश गारे यांच्यासह पीएमआरडीएतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

