बारामती, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एकच वादा, अजित दादा,’ ‘अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे,’ ‘परत या, परत या, अजित दादा परत या…’ दादा, दादा… असा हंबरडा फोडत हजारोंच्या साश्रू नयनांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अखेरचा निरोप दिला. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित दादांच्या पार्थिवावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, राज्य सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली. असा मनमिळाऊ, दिलखुलास, दिलदार नेता परत होणार नाही. अशा अवेळी अजित दादांसारखा उमदा नेता गमावल्याने धक्का बसल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी
पार्थिवाला अग्नी दिला. त्यानंतर हजारो उपस्थितांनी
हळहळ व्यक्त केली. “महाराष्ट्राची शान, पुणे जिल्ह्याचा अभिमान, बारामतीचा आत्मा… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार अमर रहे… शेतकरी, कष्टकरी, बहुजनांचे कैवारी अजित दादा अमर रहे,.अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. दादा, दादाचा हंबरडा फोडत आक्रोश व्यक्त करण्यात आला.
‘कोणतीही अडचण असो, आम्ही दादांकडे जायचो.
दादांच्या एका शब्दानेही असंख्य अडथळे दूर व्हायचे.शब्द दिला की, तो खरा करून दाखवण्याची धमक होती त्यांच्यात. आता काम घेऊन कोणाकडे जायचे,आमचे छत्र हरपले,’ अशी भावना दादांच्या
अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मुल्ला समाजातील एकाने व्यक्त केली.

















