रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी तरुणांनी पुढे यावे! सरकार आपल्या पाठीशी राहील भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रामोशी समाजाने स्वतःला मागास, गरीब समजत राहू नये. या समाजाच्या हितासाठी, उत्कर्षासाठी समाजातील तरुणांनी पुढाकार घेऊन रचनात्मक काम उभे करावे, असे आवाहन करत महायुती सरकार आपल्या पाठीशी राहील, असा विश्वासही भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला. ते जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या १९२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘मानवंदना सोहळा’ कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर, आ. राहुल कुल, मनसे नेते वसंत मोरे, अंकुशराव जाधव, रोहिदास मदने, संतोष चव्हाण, दीपक चव्हाण, गणेश गावडे, हनुमंत भांडवलकर यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी दरेकर म्हणाले की, राजे उमाजी नाईक यांचा इतिहास मी सांगण्याची गरज नाही. निधड्या छातीच्या आपल्या राजाने १४ वर्ष इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. पुण्याच्या मामलेदार कचेरीसमोर पिंपळाच्या झाडावर त्यांना फाशी दिल्यानंतरही तीन दिवस त्यांचा मृतदेह लटकवून ठेवण्यात आला होता. कारण इंग्रजांना आपली दहशत निर्माण करायची होती. तसा हा आपला राजा जगला आणि मृत्युला कवटाळले. त्यांचे आपल्यावर, महाराष्ट्रावर उपकार आहेत. यासाठी त्यांचे स्मारक दर्जेदार होणे, ज्या समाजातून आले त्या समाजाच्या ज्या-ज्या मागण्या आहेत त्या पूर्णत्वास नेणे ही आमच्यासारख्यांची जबाबदारी असल्याचेही दरेकर म्हणाले.
तसेच आपण केवळ आपला समाज मागासलेला, गरीब आहे अशाप्रकारे बोलत राहणे चालणार नाही. या समाजाला पुढे आणण्याचे काम जे पुढे येत आहेत त्यांनी केले पाहिजे. शिक्षण क्षेत्रात तरुण मुले-मुली, विद्यार्थी आले पाहिजेत. जोपर्यंत शिक्षण क्षेत्रात चांगल्या मानाच्या, अधिकाराच्या जागा मिळत नाहीत तोपर्यंत आपल्या समाजाला पुढे जाता येणार नाही. जोपर्यंत समाजात चांगले उद्योजक निर्माण होत नाहीत तोपर्यंत आपला समाज प्रगतीकडे जाणार नाही. या समाजाला पुढे करण्यासाठी एक रचनात्मक कामसुद्धा तुमच्या समाजाच्या तरुणांना उभे करावे लागेल आणि ते करावे, असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी उपस्थितांना केले.
दरेकर पुढे म्हणाले की, मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून राज्यातील वेगवेगळ्या प्रकल्प, योजणांना सहकार्य करतो. तुम्ही तुमच्या समाजाच्या उत्कर्षांचे चांगले प्रकल्प आणा तुम्हाला वाटेल ती मदत केली जाईल आणि या समाजाला पुढे आणण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून आपण निश्चितपणे योगदान देऊ, हा विश्वासही दरेकर यांनी उपस्थितांना दिला.
त्याचबरोबर ज्या योजना इतर महामंडळाच्या आहेत त्यांच्या योजनांपेक्षा काकणभर सरस योजना आपल्या महामंडळाच्या कशा होतील ते येणाऱ्या काळात पाहू. केवळ त्या योजना करणार नाही तर त्या योजणांना भरीव तरतूद करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठीही मी स्वतः आपल्या समाजासोबत असेन, असेही दरेकरांनी आश्वस्त केले.
दरेकर पुढे म्हणाले की, मला अभिमान वाटतो राज्यात जातीपातीचे राजकारण होत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे सांगितले की, खरी जात कुठली असेल तर ती गरीब जात आहे. गरीबाच्या कल्याणासाठी काम करा. गरीबाच्या कल्याणासाठी काम करणारे सरकार आज केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बसले आहे. राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपले, तुमचे सरकार आहे. या राज्य सरकारकडून समाजासाठी, समाजातील गरिबांसाठी जेजे लागेल ते ताकदीने देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करु. समाजाच्या हितासाठी, उत्कर्षासाठी जेव्हा जेव्हा आवाज द्याल तेव्हा सोबत असू, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी व्यक्त केला.














