पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवरील देखभाल, दुरुस्ती व सुरक्षेचे काम करणाऱ्या शेकडो कामगारांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप भारतीय मजदूर संघाने केला आहे. आयआरबी व आर्यन पंप या कंपन्यांमार्फत कार्यरत असलेल्या कामगारांना सन २०२४–२५ ची कायदेशीर वेतनवाढ अद्याप मिळालेली नाही. तसेच अपुऱ्या सुरक्षासाधनांमुळे आणि तुटपुंज्या ओव्हरटाईममुळे कामगारांची आर्थिक व शारीरिक पिळवणूक होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
या अन्यायकारक धोरणांविरोधात भारतीय मजदूर संघाने दिनांक २६ जानेवारी २०२६ पासून पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवरील संबंधित कार्यालयासमोर ‘रास्ता रोको’ आंदोलन व बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ यांनी दिली.
कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये २०२४–२५ ची प्रलंबित वेतनवाढ तात्काळ लागू करणे, नियमांनुसार पूर्ण ओव्हरटाईम मोबदला देणे, प्रत्येक कामगाराला किमान ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध करून देणे, तसेच हेल्मेट, सेफ्टी शूज, जॅकेट, रेनकोटसह संपूर्ण PPE किट देणे यांचा समावेश आहे.
वारंवार बैठका व लेखी निवेदने देऊनही प्रशासन व संबंधित कंपन्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीस संपूर्ण प्रशासन व कंपनी जबाबदार राहील, असा इशारा भुजबळ यांनी दिला.
सदर आंदोलनात कामगारांसह त्यांचे कुटुंबीय, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, कूसगाव कार्यालयाजवळील पास हायवेवर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत लढा मागे घेतला जाणार नाही, असा निर्धार सचिन मेंगाळे (पुणे जिल्हा मजदूर संघ) यांनी व्यक्त केला. आंदोलनात अर्जुन चव्हाण, सागर पवार, उमेश विश्वाद, बाळासाहेब पाटील यांच्यासह भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

















