“प्रभाग क्रमांक २६ चा विकासाचा आराखडा जाहीर; भैरवनाथ मंदिरात विलास नांदगुडे यांची प्रचार सभा उत्साहात”
“शंभर फुटी रस्ता, पूल, नाट्यगृह ते बस टर्मिनलपर्यंत—पिंपळे निलख–वाकडसाठी भव्य विकासाची घोषणा”

पिंपळे निलख, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पिंपळे निलख येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर परिसरात भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना माजी स्थायी समितीचे अध्यक्ष विलास नांदगुडे यांनी पिंपळे निलख व वाकड परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण विकासाचा आराखडा जाहीर केला.
नांदगुडे म्हणाले की साई चौक ते औंध मिलिटरीकडे जाणारा शंभर फुटी रस्ता तयार करण्यात येणार असून, पिंपळे निलख ते बालेवाडी दरम्यान दोन नद्यांवर दोन नवीन पूल उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मिलिटरीकडून स्टेडियमसाठी जागा घेण्याचा पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती दिली. पिंपळे निलख–वाकड परिसरात बालगंधर्वसारखे सुसज्ज नाट्यगृह उभारण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
पिंपळे निलख येथील भाजी मंडईचे आरक्षण विकसित करणे, बस टर्मिनलचा कायापालट करणे, विशाल नगर येथील प्लेग्राउंड विकसित करणे, तसेच नदी सुधार प्रकल्पाला गती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मिलिटरीकडून शेतकऱ्यांची घेतलेली जमीन शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ठोस भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच महानगरपालिकेच्या पिंपळे निलख येथील शाळेचे सीबीएसई शाळेत रूपांतर आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याच्या ठिकाणी नवीन पाईपलाईन बसवण्याचे आश्वासन देण्यात आले.
या सभेला प्रभाग क्रमांक २६ चे अपक्ष उमेदवार शंतनू नांदगुडे, सगर पवार, मीरा कदम यांच्यासह मा. नगरसेविका सुजाता नांदगुडे, नितीन थोपटे, शशिकांत मोरे, अशोक बालवडकर, विकास जगदने, मनोज कांबळे, रवींद्र कांबळे, नारायण इंगवले, सोनिया सासर, विकास साठे, अशोक शिंदे, संदीप शिर्के, मोती मुदलीयार आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















