
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी आपला प्रचार अधिक गतिमान करत चिंचवड येथील केशवनगर परिसरात सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधला. पहाटेच्या शांत वातावरणात नागरिकांना भेटत त्यांनी विकास, सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवर मतदारांशी मनमोकळा संवाद साधत मतांची आर्त हाक दिली.
ॲड. शेडगे यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत ‘प्रभाग १८ चा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय’ असल्याचे ठामपणे मांडले. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य सुविधा तसेच ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी विशेष भर दिला. “फक्त आश्वासन नव्हे तर कृतीतून विकास दाखवणारा प्रतिनिधी म्हणून मला संधी द्या,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
या प्रचारादरम्यान मॉर्निंग वॉकला आलेल्या अनेक नागरिकांनी उमेदवाराशी संवाद साधत आपल्या अपेक्षा आणि प्रश्न मांडले. भाजपच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास व्यक्त करत काही नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. साध्या, थेट आणि लोकांमध्ये मिसळणाऱ्या प्रचार पद्धतीमुळे ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा प्रचार वेगळ्या उंचीवर पोहोचत असल्याचे चित्र या वेळी पाहायला मिळाले.
केशवनगर परिसरातील हा प्रचार दौरा म्हणजे ‘जनतेपर्यंत थेट पोहोचण्याचा’ भाजपचा प्रयत्न असून, प्रभाग १८ मध्ये निवडणूक रंगात येत असल्याचे स्पष्ट संकेत या निमित्ताने मिळाले आहेत.



