ताज्या घडामोडीपिंपरीपुणे
वाल्हे येथे महर्षी वाल्मिकी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
वाल्हे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे. याच पार्श्वभूमीवर वाल्हे येथील रयत शिक्षण संस्थेचे महर्षी वाल्मिकी विद्यालयात 1974 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आयुक्त हनुमंत पवार, निवृत्त शिक्षक एस.आर.माने, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सरपंच अतुल गायकवाड, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य प्रमोद शहा, विष्णू चौधरी, गिरीश पवार, महर्षी वाल्मिकी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आर. व्ही. सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार उपस्थित होते.
या वेळेस दर दोन वर्षाने या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भेटण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी जवळजवळ १८ वर्षांनंतर एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता प्रथम सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सरस्वती पूजन व 1974 गोल्डन बॅच नावाने वडाचे वृक्ष लावून कार्यक्रमाची आगळी वेगळी सुरुवात केली. हयात नसलेल्या मित्रांना अत्यंत भावपुर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहून कार्यक्रम पुढे सुरु झाला.
तर अनेकांनी ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील, अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही भावूक झाल्याचे दिसून आले.
प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता.आम्ही तुमच्यामुळेच घडलो हे भाव मनी जपत आपोआप कित्येक जणांचे हात त्या गुरुजन वर्गाच्या पायापर्यंत जात होते, नतमस्तक होत होते वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.
यावेळी वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड, प्राचार्य आर. व्ही. सोनवणे , निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप पवार, माजी सहायक शिक्षिका भारती भागवत वीर, मुंबई बेस्टचे माजी कंट्रोलर पुणे विद्यापीठाचे शास्त्रज्ञ दिलीप ढवळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी प्राचार्य अनिल कुंभार, माजी प्राचार्या सुरेखा गुरव यांनी केले. कार्यक्रमाचे आभार किरण शहा यांनी मानले.
स्नेहमेळाव्याचे संयोजन पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, अनिल कुंभार, दिलीप पवार, अण्णा भिवा माने, भारती भागवत वीर, मीना भुजबळ झगडे, प्रकाश शिंदे, किरण शहा, पांडुरंग गुरव, रमेश राऊत, दत्तात्रय पवार आदी विद्यार्थ्यांनी केले होते.