
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आज भाजप-RPI युतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत विजयाचा आत्मविश्वास दाखवून दिला. आपल्या लाडक्या आमदार मा. शंकरभाऊ जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग १६ मधील सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य व दिमाखदार पदयात्रा काढण्यात आली.
या पदयात्रेदरम्यान संपूर्ण परिसर भगवेमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी, फलक-बॅनर्स आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे पदयात्रेला महासंग्रामाचे स्वरूप प्राप्त झाले. प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीमध्ये मतदारांनी उमेदवारांचे फुलांच्या वर्षावाने आणि जल्लोषात स्वागत केले.
आमदार शंकर जगताप यांनी पदयात्रेदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत विकासकामांचा लेखाजोखा मांडला. “भाजप-RPI युतीने प्रभाग १६ मध्ये विकासाचा भक्कम पाया घातला असून, येत्या काळात मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर अधिक गतीने काम केले जाईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनतेने दिलेल्या भरभरून पाठिंब्यामुळे यावेळी विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास त्यांच्या शब्दांतून स्पष्ट दिसून आला.
पदयात्रेदरम्यान ‘एकमुखाने भाजप… बहुमताने भाजप!’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांचा उत्साह, कार्यकर्त्यांची ऊर्जा आणि नेतृत्वाचा ठाम निर्धार यामुळे प्रभाग १६ मध्ये भाजप-RPI युतीने आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या भव्य शक्तिप्रदर्शनामुळे विरोधकांमध्ये खळबळ उडाली असून, प्रभाग १६ मध्ये विजयाची घोडदौड भाजप-RPI युतीकडे झुकत असल्याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
















