स्वाती वैद्य यांच्या ‘तुकडा तुकडा चंद्र’ या कथासंग्रहाचे प्रकाशन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तुकडा तुकडा चंद्र कथासंग्रहाचे प्रकाशन स्वाती वैद्य यांच्या कथा जगण्यातील सकारात्मकता आणि चांगुलपणा यांना चित्रित करणाऱ्या असून त्यात मानवी मनोव्यापाराचे सूक्ष्म दर्शन घडते असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक अभिराम भडकमकर यांनी केले.स्वाती वैद्य यांच्या ‘तुकडा तुकडा चंद्र’ या कथासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे,लेखिका मृणाल खडक्कर आणि प्रकाशिका प्रा. रुपाली अवचरे मंचावर उपस्थित होते.
समाजातील सारीच स्थित्यंतरे मानवी जगण्याला, नातेसंबंधांना प्रभावित करणारी असतात.समर्थ लेखक ती अचूक टिपतो.कोरोना काळातील स्थित्यंतरे मात्र साहित्यात अजूनही परीणामकारक रीतीने उमटलेली नाहीत.स्वाती वैद्य यांनी मात्र ती प्रभावीपणे रेखाटली आहेत.त्यादृष्टीने त्यांचा हा पहिलाच कथासंग्रह अतिशय आश्वासक आहे.असे गौरवोद्गार भडकमकर यांनी काढले.
मृणाल खडक्कर यांनी पुस्तकावर भाष्य करताना वैद्य यांच्या लेखनातील वैशिष्टये अधोरेखित केली.वैद्य यांची कथा स्त्री केंद्रित असूनही संपूर्ण मानवी भावजीवनाला कवेत घेणारी आहे.त्यातील चित्रदर्शिता आणि नाट्यमयता वाचकांना खिळवून ठेवते,असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे संचालन स्मिता कुळकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. रुपाली अवचरे यांनी केले.
वैद्य यांचा हा कथासंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखन अनुदान योजनेत प्रकाशित झाला असून निर्मिती यशोदिप पब्लिकेशनने केली आहे.कार्यक्रमाला लेखक अनिल आठलेकर,प्रणव पाटील, प्रसाद फाटक
सचिन काळभोर, विशाखा कुळकर्णी,ऋषिकेश ऋषी यांचेसह अनेक रसिक वाचक बहुसंख्येने उपस्थित होते.