पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याच्या राजकारणात व विकासात पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिके चा स्वतंत्र ठसा आहे. उद्योग, व्यवसाय व रोजगारासाठी राज्याच्या ग्रामीण भागातून येथे कष्टकरी, मजूर झोपडपट्टीत येऊन रहात आहेत. घाम गाळून कष्ट करत आहेत. या मजुरांना, कष्टकऱ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात, शिक्षणात, राजकारणात हवी तेवढी संधी मिळाली नाही.
यासाठी मजुरांचे नेतृत्व करण्यासाठी, त्यांचा आवाज सभागृहात पोचविण्यासाठी “महाराष्ट्र मजूर पक्षाचे” संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी दिली.
शुक्रवारी पिंपरी येथे महाराष्ट्र मजूर पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे, महिला शहराध्यक्ष सविता आव्हाड, शहर अध्यक्ष सुरेश मिसाळ, प्रदेश खजिनदार मोहन कांबळे, हवेली तालुका अध्यक्ष मीना रणदिवे, अल्पसंख्यांक सेल पुणे जिल्हाध्यक्ष इकबाल शेख, वाहतूक आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष मयूर गायकवाड, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भिसे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष राजू लोनके आदी उपस्थित होते.

















