सध्या संघटीत शक्ती विकृत करण्याचं काम सर्वत्र सुरु आहे’ – आमदार सचिन अहिर
‘महाराष्ट्रातल्या प्रत्येक झोन कार्यालयात शिवसेनेचा दबदबा टिकून’ – राजन भानुशाली
राज्य वीज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक चिंचवडमध्ये संपन्न
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ” संघटीत शक्ती आणखी वाढली पाहिजे; ती वाढण्यापेक्षा एकत्रित राहिली पाहिजे. मुळात या क्षेत्रात जेवढ्या संघटना झालेल्या आहेत, त्यात माझ्यासारख्या आणखी एखाद्याने आणखीन एका संघटनेची त्यात भर टाकून ती संघटीत शक्ती विकृत करण्याचं काम सध्या सर्वत्र केल जात आहे. सुरुवातीला मान्यताप्राप्त आणि एक संघटना अशा दोनच तीनच संघटना होत्या. त्यावेळी देखील शक्ती कोणाकडे होती? त्यापेक्षा ताकदीने याला उत्तर आणि ताकदीने याला न्याय देयचे काम कोण करू शकते? तर शिवसेनेची संघटनाच करू शकते? हे त्यावेळी आम्ही विरोधामध्ये असताना आम्हाला ऐकायला मिळत होतं, असं मत आमदार तथा भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन अहिर यांनी व्यक्त केलं.
महावितरण-महापारेषण-महानिर्मिती संलग्न ऑल इंडिया भारतीय कामगार सेना (शिवसेना प्रणित कामगार संघटनांची राष्ट्रीय संघटना) महासंघाची महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेच्या केंद्रीय कार्यकारिणीची आढावा बैठक दोन सत्रात चिंचवडगावात आज रविवारी (दि. २८) रोजी पार पडली. त्यावेळी आ. सचिन अहिर बोलत होते. यावेळी संघटनेचे केंद्रीय तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन भानुशाली, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष मनोहर भिसे, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार डॉ. राहूल पाटील, केंद्रीय कार्याध्यक्ष विनायक जाधव, शिलरत्न साळवे, केंद्रीय सरचिटणीस मधुकर सुरवाडे, कंत्राटी युनीट अध्यक्ष रमेश गणोरकर, महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी व अभियंता सेनेचे प्रादेशिक सल्लागार तथा चिंचवड विधानसभा शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पुढे बोलताना सचिन अहिर म्हणाले, ” मी स्वतः कामगार क्षेत्रातला कार्यकर्ता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना संघटीत असलेल्या आणि त्यांच्या संघटनांनादेखील न्याय द्यायची भूमिका घेतली पाहिजे. या धोरणानुसार माझ्या सुरुवातीच्या काळात पक्षाने माझ्यावर एमटीडीसीच्या सरकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी टाकली. मी प्रामाणिकपणे काम करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला. मला आश्चर्य वाटते त्यावेळी माझ्यासोबतच दिलीप वळसे पाटील साहेबांना वीज कर्मचाऱ्यांची जबाबदारी पक्षाने दिली होती. कालांतराने तेच मंत्री झाले. त्यांनी काही प्रश्न सोडवले की नाही सोडवीले? हा भाग गमतीचा. कदाचित आंबेगावातील लोकांना हे माहित असेल, अशी कोटी त्यांनी यावेळी केली. महावितरण ही संस्था आणि तिचे प्रश्न याबाबतीत महाराष्ट्रातल्या जनतेचा रोजच सबंध येतो. हे कोणीही नाकारू शकणार नाही. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान असले पाहिजे. आपण सर्वांनी एकीचे बळ दाखवित एकजुटीने संघटनेचे काम केले पाहिजे.
राजन भानुशाली म्हणाले, स्व. बाळासाहेबांच्या विचारांवर आपण चालतो. हे विचार प्रत्येक कर्मचा-याच्या डोक्यात रुजविण्याचे काम संघटनेकडून होत आहे.
सुरुवातीला लोकाधिकार समितीचे काम आम्ही सहा वर्षे केलं. १९९२ ला एका कार्यकर्त्याच्या बंगल्यावर ठराव पास करून संघटनेची बांधणी केली. बाळासाहेबांच्या सूचनेने मधुकर सरपोतदार संघटनेला अध्यक्ष लाभले. सुरुवातीला भरती- बढती-बदली अशा विषयाला हात घातला. आता आठवी पगारवाढ आम्ही यशस्वी केली आहे. दरम्यान प्रारंभी भारतीय कामगार सेनेत आम्ही सामील झालो. मेळावा घेतला. सुरुवातीला फंड गोळा होत नव्हता. महाडिक साहेबांच्या सूचनेनुसार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संघटनेची नोंदणी केली. मान्यता मिळाली. इतर संघटनांनी न केलेली कामे आम्ही केली. शिवसेनेचा प्रकाशगड आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक झोन कार्यालयात शिवसेनेचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दबदबा टिकून आहे. भारतीय कामगार महासंघाची यापुढेही साथ आम्हाला मिळावी, अशी आशा व्यक्त करतो.
मनोहर भिसे म्हणाले, सुरुवातील पिंपरी चिंचवड शहरात स्थानिक नागरिक बाहेरून आलेल्या कामगारांवर अन्याय करीत असत. त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही एकत्र आलो. शिवसेनची १९८६ साली पहिली शाखा आम्ही सुरु केली. अन्याय करणाऱ्या स्थानिकांमध्ये पक्षाच्या माध्यमातून जरब निर्माण केली. निष्ठावंत सैनिकांच्या बळावर आज शिवसेनेचे सेना भवन शहरात दिमाखात उभ आहे. संघटनेतील लोकांना मोठ केल पाहिजे. शिवसेनेत सध्या दोन गट पडले आहेत. उद्धव साहेबाना आपली आज गरज आहे. त्यासाठी एकत्र या.
संतोष सौंदणकर म्हणाले, सदस्य संख्या जेमतेम असतानाही संघटनेने केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा आयोजनाचा बहुमान आम्हाला दिला. पुढील वर्षात आणखी सभासद संख्या वाढविण्यावर भर देणार आहोत. संघटनेने सभासदांसाठी पतसंस्थेची शहरात उभारणी करावी.
दरम्यान केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वसाधारण सभेच्या बैठकीचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. संघटनेच्या प्रथम द्विवार्षिक शिर्डीतील अधिवेशनाबाबत रुपरेषा, वेतन कराराबाबत सविस्तर माहिती, पदाधिकारी यांची संघटना वाढीसाठी कार्यपध्दती निश्चित करणे, इतर संघटना सोबत आंदोलनात सहभागी होताना घ्यावयाची काळजी तसेच कृती समिती सहभागाबाबत निर्णय, संघटनेच्या सर्व परिमंडळ व केंद्रीय पदाधिकारी यांचे अधिवेशन पूर्वी दौरे व प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणेबाबत मनोगत व निर्णय आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राजेश गाढवे, संजय जाळींद्रे, संदीप गावडे, मच्छिंद्रनाथ वाळुंज, निलेश मानकर, मनोहर शिंदे, मनोज सैंदाने, ममताजी शिंदे, महेश दरेकर, दिपक कुलकर्णी, सुरेश मगर, ज्ञानेश्वर माळी, राहुल गाडे, लक्ष्मण करोटे, सुधीर बालटकर, कुमार जाबगॉड, सागर जौरो, शाम केंद्रे, सिध्दार्थ भोर, दत्ता खरपसे, रविंद्र भारमळ, अप्पा डोळे, विलास चव्हाण, बालाजी गिते, कांदे, दिपक जाधव, ज्ञानेश्वर कांबळे, स्वप्नील गाडे आदींनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश दरेकर यांनी तर, आभार संतोष सौंदणकर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.