ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये कला-क्रीडा महोत्सवाला उत्साहात सुरुवात

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘कला-क्रीडा महोत्सव २०२५’ ला उत्साहात सुरूवात झाली आहे. या स्पर्धांना शहरातील महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असून शाळास्तर, विभागस्तर आणि मनपास्तर अशा तीन टप्प्यांत राबविण्यात येणारा हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना प्रोत्साहन देणारा ठरत आहे. सध्या हा महोत्सव शाळास्तरावर सुरू असून विभागस्तरावर १५ ते २१ डिसेंबर आणि महापालिका स्तरावर २२ ते २४ डिसेंबर २०२५ याकाळात होणार आहे.

महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डिकर आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागातर्फे या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि कला नोडल अधिकारी श्रीकांत चौगुले यांच्या अधिपत्याखाली आयोजित हा उपक्रम केवळ स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, आत्मविश्वासाला आणि शारीरिक-मानसिक विकासाला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आहे, अशी माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.

कला विभागात लोकनृत्य, समूहगीत, चित्रकला आणि रांगोळी यांसारख्या पारंपरिक ते आधुनिक कलारूपांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करण्याची संधी मिळत आहे. नृत्याची लय, संगीताची सुरावट आणि सांस्कृतिक एकात्मतेची भावना यामुळे शाळांमध्ये कलामहोत्सवाचे वातावरण अधिक उत्साहपूर्ण होत आहे.

तसेच क्रीडा स्पर्धांमधील धावणे, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक यांसह कबड्डी, खो-खो आणि लेझीम यांसारख्या सांघिक खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, शिस्त, टीमवर्क, सामूहिक भावना आणि आत्मविश्वासाची मजबूत पायाभरणी होत आहे. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून या महोत्सवाला विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक, मुख्याध्यापक यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू झालेला कला-क्रीडा महोत्सव हा केवळ एक महोत्सव नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. महापालिका शिक्षण विभागाने शाळांच्या गुणवत्तावृद्धीसाठी अनेक पावले उचलली असून हा महोत्सव त्यातील एक प्रभावी पुढची पायरी आहे. विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेली प्रगती पाहून अत्यंत आनंद वाटतो. पालक आणि शिक्षकांनी दिलेले प्रोत्साहन हेच मुलांच्या यशाचे खरे बळ आहे.

— तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थी ज्या आत्मविश्वासाने कला आणि क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत, ते पाहून अभिमान वाटतो. या महोत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक मुलाला स्वतःची क्षमता ओळखण्याची आणि ती मोठ्या व्यासपीठावर सादर करण्याची संधी देणे. शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि पालकांचा विश्वास यामुळेच हा उपक्रम यशस्वी होत आहे. भविष्यातील विजेते, कलाकार आणि खेळाडू या शाळांमधूनच घडतील, याची आम्हाला खात्री आहे.
— ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button