ताज्या घडामोडीपिंपरी

शाश्वत आणि राहण्यायोग्य शहरासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत

ल्यूव्हेन (बेल्जियम) येथील इंडिया हाऊसचे संचालक गीर्ट रोबरेख्त्स यांचा दोन दिवसीय पिंपरी चिंचवड दौरा

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत बेल्जियममधील ल्यूव्हेन शहरातील इंडिया हाऊस, ल्यूव्हेन चे संचालक गीर्ट रोबरेख्त्स यांनी ३ आणि ४ डिसेंबर रोजी दोन दिवसीय भेट देत महापालिकेच्या विविध विभागांशी चर्चा केली. शाश्वत विकास, नवोपक्रम, उद्योग क्षेत्र आणि शहरी गतिशीलता या क्षेत्रांमध्ये महानगरपालिका आणि ल्यूव्हेन शहर यांच्यातील भविष्यातील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरला.

या भेटीदरम्यान रोबरेख्त्स यांनी महापालिकेचे मुख्य अभियंता आणि पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी व सहशहर अभियंता व शहरी दळण वळण विभाग प्रमुख बापूसाहेब गायकवाड, ऑटो क्लस्टर व पीसीएसआयसी चे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, इंडस्ट्री फॅसिलिटेशन सेलचे प्रतिनिधी विजय वावरे, सीएसआर सेल प्रतिनिधी श्रुतीका मुंगी, तसेच सस्टेनेबिलिटी सेलच्या तांत्रिक सहाय्यक पथकाशी सखोल चर्चा केली.

या चर्चांमध्ये पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक व नवोपक्रम परिसंस्था, अॅक्टिव्ह मोबिलिटी इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास, वाहतूक व्यवस्थापनातील प्राधान्यक्रम, शहरी गतिशीलतेतील आव्हाने आणि सस्टेनेबिलिटी सेलची भविष्यातील दिशा यावर माहिती सादर करण्यात आली.

दौऱ्यादरम्यान रोबरेख्त्स यांनी ऑटो क्लस्टरला भेट देऊन उद्योजक आणि स्टार्टअप्सशी संवाद साधला तसेच कौशल्यविकास, नवोपक्रम आणि उद्योजकतेला महानगरपालिका देत असलेल्या प्रोत्साहनाची पाहणी केली. दुसऱ्या दिवशी अॅक्टिव्ह मोबिलिटी आणि नागरी वाहतूक क्षेत्रातील महापालिकेच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

ही भेट आययूआरसी (आंतरराष्ट्रीय नागरी व प्रादेशिक सहकार्य) कार्यक्रमांतर्गत बार्सिलोना येथे झालेल्या स्मार्ट सिटी एक्स्पो २०२५ मधून सुरू झालेल्या संवादाचा पुढील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे.

बार्सिलोना येथे झालेल्या बैठकीत सुरू झालेल्या चर्चेला या दौऱ्यामुळे सकारात्मक गती मिळाली आहे. शाश्वत शहरनिर्मितीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्याबाबत महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.

-संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका.

लहान अंतरांसाठी शहरवासीयांनी अॅक्टिव्ह मोबिलिटीचा अवलंब करण्यासाठी दीर्घकालीन वर्तनबदल अत्यंत आवश्यक आहे. या क्षेत्रातील ल्यूव्हेनचा अनुभव महानगरपालिकेसाठी साठी उपयुक्त ठरेल.

-बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

पिंपरी चिंचवड महापालिकेची शाश्वततेसाठीची बांधिलकी, औद्योगिक क्षमता आणि वाढती स्टार्टअप संस्कृती अत्यंत प्रभावी आहे. नवोपक्रम, अॅक्टिव्ह मोबिलिटी आणि शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये भविष्यातील सहकार्याबाबत ल्यूव्हेन सकारात्मक आहे.

गीर्ट रोबरेख्त्, संचालक, इंडिया हाऊस, ल्यूव्हेन (बेल्जियम).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button