पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी चौकात अहिल्यादेवी पुतळ्यासमोर बसविण्यात आलेला अशास्त्रीय आणि अपघातजन्य काँक्रिट डिव्हायडर तात्काळ हटवावा, या मागणीसाठी आज रिक्षा-टॅक्सी चालकांनी मनपा मुख्यालयासमोर मोठे एल्गार आंदोलन केले. हे आंदोलन महाराष्ट्र रिक्षा पंचायत कष्टकरी जनता आघाडी आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झाले.
आंदोलनादरम्यान आंदोलकांनी “भ्रष्टाचार बंद करा”, “डिव्हायडर हटवा”, “वाहतूक कोंडी थांबवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी डॉ. कांबळे यांनी मनपा आयुक्तांना संबोधित सात मागण्यांचे निवेदन सादर केले. मनपाचे अधिकारी अभिमन्यू भोसले यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले व डिव्हायडरबाबत तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले.
डॉ. कांबळे यांनी प्रशासनावर आर्थिक गैरव्यवहार आणि वाहतूक सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत म्हटले,
“हा डिव्हायडर जनतेच्या जीवाशी खेळ करणारा आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला असून जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई झालीच पाहिजे. आज निर्णय झाला नाही, तर आम्ही आमदार-खासदारांच्या घरावर मोर्चा काढू.”
आंदोलनातील प्रमुख मागण्या:
मोरवाडी चौकातील अपघातजन्य डिव्हायडर तात्काळ हटवावा,2. डिव्हायडर बसविण्याच्या प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करावी,3. संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, 4. वाहतूक सुरक्षा व आर्थिक अनियमिततेची स्वतंत्र तपासणी करावी.,5. भविष्यातील रस्ते सुशोभीकरण योजनांमध्ये जनसहभाग बंधनकारक करावा.
यावेळी आशा कांबळे, रफीक कुरेशी, राजा नायर, गौरी शेलार, बळीराम काकडे, मधुरा डांगे, मीनू गिल, दामोदर मांजरे, ज्योती कांबळे, इस्माईल मामूर शेख, मलिक शेख, शिवाजी कुडूक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने रिक्षा-टॅक्सी चालक उपस्थित होते.

















