शहाण्णव कवितांच्या संग्रहाचा प्रकाशन सोहळा डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात उत्साहात संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘शहाण्णव कवितांच्या संग्रहाचा* प्रकाशन सोहळा’ साहित्यिक, कवी व मान्यवरांच्या उपस्थितीत आज उत्साहात संपन्न झाला.
या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी डी पाटील (कुलपती- डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ, पुणे , कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रदीप दाते कार्याध्यक्ष ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) तसेच कवितासंग्रहाचे प्रकाशन डॉ. सदानंद मोरे (अध्यक्ष ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन), डॉ. श्रीपाल सबनीस (अध्यक्ष ८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन), लक्ष्मीकांत देशमुख (९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन),राजन लाखे (कवी कट्टा प्रमुख ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) व डॉ एन जे पवार (कुलगुरू डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ, पुणे) यांच्या उपस्थित संपन्न झाला.
” या कवी संग्रहाच्या माध्यमातून कवितेला एक वेगळ व्यासपीठ मिळाले आहे याचमुळे कवींना कविता लेखन करण्याचा उत्साह नक्कीच वाढला आहे. या काव्यसंग्रहात चित्रकाराने चित्राबरोबर सुलेखनच्या माध्यमांतून कवितेला खऱ्याअर्थाने न्याय दिला आहे. आजच्या या कविता संग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमातून साहित्यिकांच्या विचारांचे विचारमंथन झाले हा एक आनंदी व भाग्यचा क्षण मी समजतो असे उद्गगार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी डी पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले
“या कवितासंग्रहाच्या प्रेरणेने अनेक कवी निर्माण होतील पण तपश्चर्या व सर्वाभिमुख अभ्यासाचे बळ कवींनी मिळवणे गरजेचे आहे. तसेच विचारांची व्याप्ती वाढायला हवी तरच समृद्ध कवी उदयास येतील. आपल्या भूमीत कवी अमाप आहेत पण या कवींना सन्मान देण्याची भूमिका या सारख्या सोहळ्याच्यातून आज दिसते. महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनेक श्रीमंत माणसे भेटली या संस्कृतीची पूजा करणारा विनम्र माणूस म्हणून मी डॉ पी. डी पाटील यांच्या रूपाने पाहतो साहित्य कळण्यापेक्षा साहित्यांची जाणीव ठेवणारे ते व्यक्तिमत्त्व आहे. साहित्य संमेलनामध्येच रसिकांची ओढ लक्षात घेऊन या कविकट्टाच्या जन्म झाला त्यामुळेच कवींच्या इतिहासामध्ये राजन लाखे हा माणूस कधीच विसरला जाणार नाही” असे मत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
‘कवी समाजात बदल घडविण्याचे काम करतो त्याने त्याचे अस्तित्व काम ठेवले पाहिजे आणि समाजामध्ये सकारात्मक विचार वाढविण्यासाठी पुढे यावे ” असे मत डॉ. सदानंद मोरे व्यक्त केले.
‘कवी हा आपल्या कविता, आपला परिसर, वास्तव व समाजभान या सर्व गोष्टी आपल्या काव्यातून उतारवतील आणि समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतील हीच या कवींकडून अपॆक्षा करतो” असे मत प्रदीप दाते यांनी व्यक्त केले.
“साहित्य उपक्रमामध्ये साहित्य रसिकाची जेव्हा मदत सकारात्मक भावनेने मिळते तेव्हाच निखळ साहित्य निर्माण होते” असे मत लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून महाराष्ट्रतील अनेक कवींना जर स्वतंत्र व्यासपीठ कविकट्टाच्या माध्यमातून मिळाले आहे.
“शब्द, रूप, भाव, आशय, भाषा, विचार, कल्पना, लय या सौंदर्याचा लाटांवर नृत्य करणारा अनोखा संगम म्हणजे ९६ कवितांचा संग्रह होय. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना नंतर ८ वर्षांनी आम्ही हा कविता संग्रह देऊ शकलो. या संपूर्ण वाटचालीत डॉ पी. डी. पाटील सरांची भक्कम साथ मिळाली हाच तो परीसस्पर्श म्हणावे लागेल त्यांनी वर्ध्याच्या संमेलनात दिलेला शब्द आज पूर्ण झाला. या कवी संग्रहाच्या यशस्वी वाटचाली माहिती राजन लाखे यांनी प्रास्ताविकेत केली.
मागील वर्षी वर्धा मध्ये संपन्न झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवीकट्टायातून निवडलेल्या ९६ कवितांच्या संग्रहाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. या साहित्य संमेलनामध्ये एकूण १५०० कवितांपैकी तीन दिवसांमध्ये ५२० कवितांचे सादरीकरण संमेलनाच्या कविकट्ट्यावर करण्यात आले होते. त्यातील निवडक ९६ कविताचा हा संग्रह आहे. या संग्रहाची वैशिष्टये आकर्षक मुखपृष्ठ आणि प्रत्येक पानावर कवितेच्या आशयानुसार रंगीत चित्र व सुलेखन केले आहे. कवींच्या प्रेमाखातर डॉ. पी. डी पाटील यांनी वर्धाच्या संमेलनात कविकट्टाच्या मंचावर ९६ कवितांचा संग्रह प्रकाशित होईल असे जाहीर केले होते आज त्यांच्या शब्दांची प्रत्यक्षात पूर्ती होत आहे.
या कवी संग्रहासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीचा सत्कार यावेळी करण्यात आला यामध्ये सुलेखन व चित्रकार राजेंद्र अत्रे, परीक्षक डॉ. राजेंद्र राऊत, संपादन सहायक नंदकुमार मुरडे, माहितीपट शरद आढाव तसेच उत्कृष्ट ५ कवींसह इतर ९१ कवींना प्रत्येकी ५०००/- रुपयाचे पारितोषिक जाहीर करुन त्यांचा सन्मान केला. गायिका रिचा राजन या गायिकेने रसिक मंत्रमुग्ध झाले. हा प्रकाशन सोहळा पिंपरी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष घुले यांनी केले.