कंपन्यांची मनमानी आणि सरकारचे दुर्लक्ष खपवून घेणार नाही..
९ ऑक्टोबरचा बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरा.. डॉ. बाबा कांबळे यांचे रिक्षा, टॅक्सी चालकांना आवाहन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रिक्षा, टॅक्सी आणि इतर वाहतूकदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या ९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यव्यापी संपाच्या तयारीसाठी सुरू असलेल्या जनजागृती दौऱ्याला पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या दौऱ्याअंतर्गत आज ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांचे इचलकरंजी येथे आगमन झाले. यावेळी शहरातील रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक-मालकांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात भव्य स्वागत केले.
शहरात आगमन होताच डॉ. कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर श्री आवाडे जनसंपर्क कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली, ज्यात शेकडो चालक-मालक सहभागी झाले होते.
सभेत बोलताना डॉ. कांबळे म्हणाले, “बेकायदेशीर बाईक टॅक्सीमुळे आमचा रोजगार हिसकावला जात आहे. मुक्त परवाना धोरणामुळे अनियंत्रित स्पर्धा निर्माण झाली आहे आणि ओला-उबेरसारख्या कंपन्या चालकांची पिळवणूक करत आहेत. सरकारने कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन देऊनही ते अमलात आणले नाही. आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. ९ ऑक्टोबरचा बंद ऐतिहासिक करून सरकारला आपली ताकद दाखवूया.”
सभेचे प्रास्ताविक महाराष्ट्र फेडरेशनचे कार्याध्यक्ष अनिल बम्मन्नावर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर डॉ. राजीव मिश्रा, श्री. निवास येरोपोटो, रामभाऊ पाटील, संजय येलाज, मन्सूर सावनूरकर, मुन्ना चौधरी, सचिन मस्के, अल्ताफ शेख, राजू आवळे, दीपक जाधव, सुनील गायकवाड, रामा कांबळे, सलीम तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कांबळे यांनी संपाच्या प्रमुख मागण्या स्पष्ट केल्या —
मुक्त परवाना पद्धत रद्द करा
बेकायदेशीर बाईक टॅक्सी बंद करा
चालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करा
CNG टेस्टिंग फी ₹५०० वर आणा
ओला-उबेरचे दर शासनाने निश्चित करावेत
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मल्लिकार्जुन बिल्लुर यांनी केले.
सभेला मोठ्या संख्येने रिक्षा चालक-मालक उपस्थित होते.













