महापालिकेच्या भोसरी येथील इंद्रायणीनगर शाळेत “कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला”
राज्यस्तरीय बालकवी संमेलनासाठी इंद्रायणीनगर शाळेतील सुप्रिया यादव व आरोही निकाळजे यांची निवड

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इंद्रायणीनगर प्राथमिक शाळेत काव्यवाणी काव्यसंस्थेच्या माध्यमातून “कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला”हा उपक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहायक आयुक्त किरणकुमार मोरे आणि प्रशासन अधिकारी संगीता बांगर मुख्याध्यापिका वंदना इन्नाणी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत पाठ्यपुस्तकातील कवयित्री संगिता झिंजुरके यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली.कविता म्हणजे अंतरीचा आनंद, विचारांना आणि कल्पनांना यमकाने सजवणे तसेच विचारांना तालबद्ध करणे असे सोप्या आणि समजण्यासारख्या शब्दात मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
विशेष म्हणजे कोणत्याही पूर्वतयारीशिवाय १० ते १२ विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. यामधील सुप्रिया अनिल यादव आणि आरोही निकाळजे या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय बालकवी संमेलनासाठी निवड झाली असून महापालिकेसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
विद्यार्थ्यांची शिस्तबद्धता आणि सक्रिय सहभाग हा कौतुकाचा विषय ठरला. काव्यवाणी काव्य संस्थेच्या अध्यक्षा वाणी ताकवणे यांनी सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागाचे विशेष कौतुक केले. संस्थेच्या युवा सदस्यांनी सादर केलेल्या कवितांनीही उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.शिक्षिका कविता बोऱ्हाडे यांनी प्रास्ताविक केले तर मुख्याध्यापिका वंदना इन्नाणी यांनी स्वागत केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धायरकर सर यांनी केले.













