प्राधिकरणात वीर गौरव सेनानी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय भूतपूर्व सैनिक संघ – पुणे जिल्हा यांच्या वतीने (गुरुवार, दिनांक १८) ग. दि. माडगूळकर सभागृह, पेठ क्रमांक २६, निगडी प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वीर गौरव सेनानी सन्मान सोहळा अपूर्व उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी सेवानिवृत्त ब्रिगेडियर इंदरमोहन सिंह, सेवानिवृत्त सार्जंट गोपाल वानखेडे, सेवानिवृत्त ब्रिगेडियर एच. के. दडित, सेवानिवृत्त कर्नल व्ही. व्ही. वेसावीकर, माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, सलीम शिकलगार, अरुण थोरात, भारतीय भूतपूर्व सैनिक संघ – पुणे जिल्हा अध्यक्ष यशवंत महाडिक, मानद सचिव दत्तात्रय कुलकर्णी, मानद कोषाध्यक्ष मारुती भराटे, सोहळ्याचे मुख्य संयोजक ज्येष्ठांचा मानसपुत्र तसेच भा. ज. पा. पिंपरी – चिंचवड शहर उपाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे आदी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन, छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि सद्गुरू वामनराव पै यांच्या विश्वप्रार्थनेने सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. वीर गौरव सेनानी सन्मान सोहळ्यात ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या भारतीय सैन्यातील विविध अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर वीरनारी आणि ज्येष्ठ सैनानींना सन्मानित करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा धनादेश शिष्यवृत्तीप्रीत्यर्थ प्रदान करून त्यांचे कौतुक करण्यात आले. सन्मानादरम्यान सभागृहात उत्स्फूर्त देशभक्तिपर घोषणांनी चैतन्य निर्माण झाले होते.
त्यानंतर माजी सैनिकपुत्र चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांनी लिहिलेल्या अनावृत्त पत्राच्या उत्कट अभिवाचनाने सर्व उपस्थित अंतर्मुख होऊन भारावून गेले. सत्कार सोहळ्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यशवंत महाडिक यांनी प्रास्ताविक केले. भारतीय भूतपूर्व सैनिक संघ – पुणे जिल्हा यांच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात सहकार्य केले. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने सोहळ्याचा समारोप करण्यात आला.













