बिन लग्नाची गोष्ट : उन्नती सखी मंचचा खास प्रीमियर शो उत्साहात संपन्न

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्नती सखी मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “बिन लग्नाची गोष्ट” या मराठी चित्रपटाच्या विशेष प्रीमियर शोला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा शो सिटी प्राईड रॉयल सिनेमा, जगताप डेअरी, रहाटणी येथे पार पडला.
या शोमध्ये सखी मंच सदस्यांना विशेष सवलतीच्या दरात चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. चित्रपटानंतर प्रेक्षकांना चित्रपटातील कलाकारांसोबत तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेत्री सौ. निवेदिता सराफ यांच्यासोबत प्रत्यक्ष संवाद साधण्याचा आणि स्मरणीय छायाचित्रे घेण्याचा अनोखा अनुभव घेता आला.
शोपूर्वी अभिनेत्री निवेदिता सराफ, दिग्दर्शक व कलाकार वृंद यांनी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदा संजय भिसे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी भारतीय पारंपरिक पद्धतीने साडी–चोळी देऊन निवेदिता सराफ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच चित्रपटातील कलाकारांचाही सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदा संजय भिसे म्हणाल्या की,“चित्रपट ही केवळ करमणुकीची साधने नसून सामाजिक विचार मांडण्याचे सामर्थ्य असलेले प्रभावी माध्यम आहे. ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटातून समाजातील अनेक वास्तव प्रश्न हलक्या-फुलक्या स्वरूपात मांडले गेले आहेत. उन्नती सखी मंचतर्फे सदस्यांना असा अनोखा अनुभव मिळावा याचा आम्हाला आनंद आहे.”
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगीता तरडे यांचे विशेष योगदान राहिले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, तसेच उन्नती सखी मंचच्या उपाध्यक्षा डॉ. रश्मी मोरे यांच्यासह मंचाच्या अनेक महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.













