ताज्या घडामोडीपिंपरी
शिक्षणाबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव होणे ही काळाची गरज – सुलभा उबाळे
माजी प्रशिक्षणार्थी संतोष सौंदणकर यांच पर्यावरणपूरक योगदान

कॅम्प एज्युकेशन सोसायटीतील आयटीआयच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्पाची मुहुर्तमेढ
प्राधिकरण, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-“शिक्षणाबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव होणे ही काळाची गरज आहे. सौरऊर्जा प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तंत्रज्ञान समजेल, वीज बचत होईल आणि पर्यावरणपूरक ऊर्जा वापराचा आदर्श समाजासमोर उभा राहील,” असे प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे यांनी निगडी प्राधिकरण येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) सौरऊर्जा प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी केले.
कॅम्प एज्युकेशन सोसायटीतील आयटीआयच्या छतावर पाच किलोवॅट क्षमतेचे सोलार पॅनल बसविण्यात आले आहे. या उपक्रमामुळे संस्थेची दरमहा हजारो रुपयांची वीज बचत होणार असून, प्रशिक्षणार्थ्यांना आधुनिक ऊर्जातंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी संस्थेचे माजी प्रशिक्षणार्थी व पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या या योगदानामुळे आजी विद्यार्थ्यांपुढे एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे.
लोकार्पण सोहळ्यास कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर,प्राचार्य, बसवराज विभुते मनीषा गाढवे गटनिदेशिका, हनमंत सावंत वीजतंत्री निदेशक, वैशाली ढेरंगे आरेखक यांत्रिकी निदेशक, अर्जुन कदम वीजतंत्री निदेशक, शामल खडबडे आरेखक यांत्रिकी निदेशक, मनिषा घोडके विजतंत्री निदेशक, सिताराम मुसळे वेल्डर निदेशक, सुरज भराटे, उमेश परदेशी, गणेश गाडे, सर्व शिक्षकवर्ग यांच्यासह मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना सुलभाताई म्हणाल्या, “या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा अभ्यास करतानाच पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. शिक्षण केवळ नोकरीपुरते मर्यादित नसून समाजाशी जोडलेले असावे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. संतोष सौंदणकर यांची निःस्वार्थ सेवा ही समाजासाठी प्रेरणादायी आहे. या उपक्रमामुळे केवळ वीज बचतच नाही तर ‘हरित ऊर्जा’ वापराचा आदर्श संस्थेने ठेवला आहे. पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष तंत्रज्ञान शिक्षण या तिन्ही बाबींचा संगम या प्रकल्पातून साधला जाईल, अशी आशा आहे.
वालचंद संचेती यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, “सौरऊर्जा ही शाश्वत विकासाची गुरुकिल्ली आहे. या प्रकल्पामुळे संस्थेची मोठ्या प्रमाणात वीज बचत होईल. शिवाय, प्रशिक्षणार्थ्यांना या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाल्याने ते उद्योगक्षेत्रासाठी अधिक सक्षम व स्पर्धात्मक होतील.”
गटनिदेशक मनिषा गाढवे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिक कौशल्यच नव्हे तर पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवली पाहिजे. या सौरऊर्जा प्रकल्पातून दोन्ही गोष्टींचा संगम साधला गेला आहे. भविष्यातील ऊर्जा गरज पूर्ण करण्यासाठी अशा पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकायला मिळणे ही आनंदाची बाब आहे.”
प्राचार्य बसवराज विभूते यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “संस्थेचे माजी प्रशिक्षणार्थी संतोष सौंदणकर यांनी केलेले योगदान आमच्या मूल्यांना साजेसे आहे. त्यांनी आपला वेळ, कौशल्य आणि निधी संस्थेसाठी समर्पित केला, ही सामाजिक जाण व सेवाभावना अत्यंत प्रशंसनीय आहे. अशा जबाबदार प्रशिक्षणार्थ्यांमुळेच समाजात सकारात्मक बदल घडतो.”
संतोष सौंदणकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “संस्थेने माझ्या जडणघडणीत मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे संस्थेसाठी काहीतरी देणे ही माझी सामाजिक बांधिलकी आहे. समाजाचे देणे फेडणे आणि पुढील पिढ्यांसाठी थोडा हातभार लावणे, हे माझे कर्तव्य आहे. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक (मानव संसाधन), मुंबई, प्रकाशगड राजेंद्र पवार यांच्या प्रेरणेनेच मला ही संकल्पना सुचली. योग्य वेळी संस्थेला मदत करता आली, हेच माझ्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे. संस्थेसाठी माझा थोडासा का होईना सहभाग लाभला, हाच माझा खरा अभिमान आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. चैत्राली क्षिरसागर हीने तर, सूत्रसंचालन चेतना आटकरी आणि आभार प्रदर्शन कु. कृष्णा क्षिरसागर यांनी मानले.













