पिंपरी-चिंचवड शहर भाजपा युवा मोर्चाला मिळाले ऊर्जावान नेतृत्व
दिनेश यादव यांची भाजयुमोच्या शहराध्यक्षपदी निवड युवकांना संघटनात्मकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देणार - दिनेश यादव

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टीच्या संघटनवाढीच्या ध्येयाला नवी गती देत पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्षपदी दिनेश लालचंद यादव यांची एकमताने निवड झाली आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी त्यांच्या निवडीची नुकतीच घोषणा केली.
कुदळवाडी परिसरातून सामाजिक कार्याची वाटचाल सुरू करून शहरभर युवकांना एकत्रित करणारे दिनेश यादव हे युवकांच्या आशा-आकांक्षांचे नवे प्रतीक ठरत आहेत. आमदार महेशदादा लांडगे यांच्या मुशीत तयार झालेले यादव हे त्यांचे संघटन कौशल्य, नियोजनबद्ध कामकाज आणि लोकहितासाठीची धडपड यामुळे या पदास पात्र झाले.
युवा मोर्चा ही संघटनेची कणा मानली जाते. शहरातील युवकांना सामाजिक व राजकीय प्रवाहात आणणे, रोजगार व शिक्षण क्षेत्रात त्यांना दिशा देणे आणि सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांद्वारे त्यांची क्षमता उजागर करणे या उद्दिष्टांसाठी दिनेश यादव यांनी ठोस कार्यक्रम राबवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
आतापर्यंत रोजगार, मार्गदर्शन शिबिरे, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धा, रक्तदान शिबिरे अशा अनेक उपक्रमांतून त्यांनी युवकांमध्ये ऊर्जा निर्माण केली आहे.
युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांचा शहरात विस्तार करण्यावरही त्यांनी भर दिला आहे. ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ मोहिमेद्वारे प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणे, ‘युवा संवाद’ उपक्रमातून थेट संवाद साधणे, तसेच ‘सेवा पखवाडा’ अंतर्गत आरोग्य तपासणी, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक कार्यक्रम राबवणे, अशा विविध उपक्रमांतून संघटनवाढीला गती मिळेल, असे यादव यांनी स्पष्ट केले. नव्या जबाबदारीनंतर यादव यांनी सर्वांचा विकास आणि पक्षाची संघटनवाढ हेच प्राधान्य असल्याचे सांगितले.
“ भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक तरुणाला संधी आणि व्यासपीठ मिळाले पाहिजे, हीच माझी धडपड असेल. शिक्षण, रोजगार, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत युवकांना पुढे आणून पिंपरी-चिंचवडला संघटनात्मकदृष्ट्या सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे,”
-दिनेश यादव, नवनियुक्त शहराध्यक्ष – पिंपरी-चिंचवड शहर भाजयुमो















