गणपती आगमनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर वाकलेल्या झाडांमुळे अडथळा; वेळेत झाडकटाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा”

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गौरी गणपती आगमन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना तानाजीनगर, पोदार शाळा, श्री शिवाजी उदय मंडळ रोड, विवेक वसाहत, काकडे पार्क, केशवनगर ते गणेश विसर्जन घाट या मुख्य रस्त्यांवर झाडांच्या फांद्या रस्त्यावर वाकल्या असून, मोठ्या गणपती मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनांसाठी अडथळा निर्माण झाला आहे.महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांनी उद्यान विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिका प्रशासन वेळेत झाडकटाई करत नाही, याबाबत अनेक वेळा निवेदन व पाठपुरावा करूनही फारसा परिणाम झालेला नाही. ऐनवेळी फक्त काही ठिकाणी झाडकटाई करून वेळ मारून नेली जाते, अशी तक्रार नागरिक व मंडळांनी केली आहे.
महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांनी यासंदर्भात प्रशासनाला वेळोवेळी कल्पना दिली असतानाही झाडकटाई न झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. गणपती आगमन व विसर्जन वेळी कार्यकर्ते हातात बांबू घेऊन फांद्या बाजूला करत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन झाडकटाई का केली नाही याचा जाब संबंधित अधिकाऱ्यांना विचारून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मधुकर बच्चे यांच्या वतीने झाडांच्या फांद्या स्वतः कट करून प्रभाग व उद्यान कार्यालयात आणून टाकण्यात येतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.















