ताज्या घडामोडीपिंपरी

निगडी प्राधिकरणात डक्टमध्ये गुदमरून तिघा कंत्राटी कामगारांचा मृत्यू; अ‍ॅड. सागर चरण यांच्याकडून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे चौकशीची मागणी

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी प्राधिकरणात डक्टमध्ये गुदमरून तिघा कंत्राटी कामगारांचा मृत्यू; अ‍ॅड. सागर चरण यांच्याकडून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे चौकशीची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण येथे स्वातंत्र्यदिनी घडलेली एक दुर्दैवी घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास एचडीएफसी बँकेजवळ बीएसएनएलच्या डक्टमध्ये ऑप्टिकल फायबर टाकण्याचे काम सुरू असताना तिघा कंत्राटी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांची नावे लखन धावरे, साहेबराव गिरसाट आणि दत्ता होनाळे असून ते सर्व चिंचवड येथील बिजली नगर परिसरातील रहिवासी होते.

अपघातावेळी चेंबरमध्ये साचलेल्या प्राणघातक वायूमुळे या तिघांचा श्वास घेणं कठीण झालं आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चौथा कामगार जिवंत राहिला असून त्याने अलार्म वाजवून मदतीसाठी आक्रोश केला. मात्र, वैद्यकीय सेवा पोहोचण्याआधीच तिघांचे प्राण गेले. कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा साधने, प्रशिक्षण वा योग्य निरीक्षण दिसून आले नाही.

घटनेनंतर अ‍ॅड. सागर चरण यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांच्याकडे लेखी निवेदन देत त्वरित चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी विचारले आहे की:

या कंत्राटी कामगारांना डक्टमध्ये उतरायला परवानगी कोणी दिली?

त्यांच्या सुरक्षेसाठी कोणती उपाययोजना केली होती?

चेंबरमध्ये प्राणघातक वायू साचण्याची शक्यता का तपासली गेली नाही?

बीएसएनएलसारख्या संस्थेसाठी काम करताना महापालिकेच्या नियमांची अंमलबजावणी का झाली नाही?

यासोबतच, अ‍ॅड. सागर चरण यांनी दोषी कंत्राटदाराचा करार तात्काळ रद्द करावा, संबंधितांवर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ व “हाताने मैला उचलण्याच्या कामावर बंदी” कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांच्या कुटुंबीयांना किमान ३० लाख रुपये नुकसान भरपाई, घरातील एका सदस्याला कायमस्वरूपी नोकरी आणि पुनर्वसनाची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

ही घटना केवळ एका यंत्रणेच्या निष्काळजीपणाचे दुर्दैवी उदाहरण नसून, कामगारांच्या जीवाची किंमत किती स्वस्त केली जात आहे हे अधोरेखित करते. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आज तिघांचे आयुष्य संपले. या घटनेने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले असून, यावर तातडीने कठोर कार्यवाही आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button