पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच महिलांकडून फोडली गेलेली ‘उन्नती’ ची दहीहंडी

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात उन्नती सोशल फाउंडेशन व उन्नती सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकडून फोडली जाणारी उन्न’ती’ ची दहीहंडी प्रथमच मोठ्या उत्साहात पार पडली. तत्पूर्वी उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे कृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले या निमित्ताने ५६ भोग प्रसाद श्रीकृष्णाला अर्पण करण्यात आला. पारंपरिकरित्या पुरुषांकडून फोडली जाणारी दहीहंडी महिलांच्या पुढाकारातून आयोजित होऊन सामाजिक परिवर्तनाचा अनोखा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. छोट्या मुलीकरवी उन्न’ती’ ची दहीहंडी फोडण्यात आली.
या सोहळ्या मागील संकल्पना विशद करताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदा संजय भिसे म्हणाल्या, “ उन्नती सखी मंचच्या महिला सदस्यांनी स्वतःहून हाती घेतलेला हा उपक्रम खरोखरच ऐतिहासिक आहे. महिलांनी जर एकत्रितपणे पुढाकार घेतला तर समाजातील कोणतीही प्रथा, परंपरा किंवा उपक्रम नव्या दृष्टीकोनातून राबविता येतो, हे या दहीहंडीमधून सिद्ध झाले आहे. उन्नती सखी मंचने दाखवलेले धैर्य आणि एकजूट शहरातील इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आहे.”
या ऐतिहासिक सोहळ्याला संस्थापक संजय तात्याबा भिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच आनंद क्लब, ऑल सीनियर सिटीजन असोसिएशन, विठाई वाचनालय, उन्नती सखी मंचच्या महिला सदस्य आणि उन्नती सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उन्नती सखी मंचच्या उपाध्यक्षा डॉ.रश्मी मोरे यांनी केले.













