पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अयोध्येत साकारण्यात आलेल्या श्री राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवारी, २२ जानेवारीला होणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण शहरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. शहरातील मंदिरे विद्युत रोषणाईने झळाळली आहेत. संस्था, सामाजिक संघटना आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जय्यत तयारीला लागल्या आहेत. शहरातील बाजाराला दिवाळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार असल्याने शहरात व उपनगरातील वातावरण राममय झाले आहे. बाजारपेठेत दिवाळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बाजारात भगवे झेंडे, पताका, बॅनर्स विकत घेण्यासाठी रामभक्त गर्दी करत आहेत. पूजेचे साहित्य खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू आहे. श्रीरामांचे चित्र असलेल्या झेंड्यांना सर्वाधिक मागणी आहे. हे झेंडे उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या किमती खूप वाढलेल्या आहेत. शहरातील मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घरोघरीही विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. प्रभू रामांच्या मूर्तीबरोबर आकर्षक सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली जात आहे.
ठिकठिकाणी धार्मिक विधी पूजा, गीत रामायण कार्यक्रम यावेळी पार पडत आहेत. काही ठिकाणी मिरवणुकीत राम मंदिराची प्रतिकृती, भाविकांसाठी विविध स्पर्धा, त्याचबरोबर नृत्य, भजन, भावगीते आणि एक दिवस राम नामाचा जप, असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील रस्ते, मुख्य चौक झाले राममय
शहरातील मुख्य चौकात शुभेच्छापर फ्लेक्स लागले आहेत. रामभक्तांनी ठिकठिकाणी भव्य मिरवणूक आरती, प्रसाद, लाडू वाटप असे विविध उपक्रम गणेश मंडळ, सामाजिक संस्था व मंदिरात २२ जानेवारीला घेतले आहेत. शहरासह उपनगरेही भगवी झाली असून, सर्वत्र राममय आनंद उत्सव साजरा केला जात आहे.

















