ताज्या घडामोडीपिंपरी

भविष्यातील अडचणी विचारात घेऊन दीर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करा – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे शासकीय यंत्रणांना निर्देश

Spread the love

भविष्यातील अडचणी विचारात घेऊन दीर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करा

आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांचे शासकीय यंत्रणांना निर्देश

पिपंरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भविष्यातील अडचणी विचारात घेऊन दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पीएमआरसह हिंजवडी आणि शहर परिसराला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच आवश्यकतेनुसार रस्ते रुंदीकरण करणे अपेक्षित आहे. यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळेल. त्याअनुषंगाने प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयातून रस्ते रुंदीकरणासह दुरुस्ती करत नागरिकांच्या प्राथमिक गरजा अशा पूर्ण होतील, त्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांनी हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीसंबंधी केलेल्या उपाययोजनांची पाहणीनंतर शनिवारी (दि.२६) आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंह, पीएमसीचे आयुक्त नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) हिंजेवडी परिसरासह माण, म्हाळुंगे, सूस आदी भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, मेट्रोची सुरु असलेली कामे गतीने पूर्ण करावेत, विविध विकास कामे करतांना स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिकांना विश्वासात घेवून वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा, असे निर्देश पालकमंत्री अजितदादा पवार यांनी दिले. आगामी काळातील पुण्याची लोकसंख्या आणि दळणवळणाच्या सुविधांचा विचार करून पीएमआर क्षेत्र, हिंजवडीसह औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारणीवर भर देणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असल्याने आवश्यक त्या रस्त्यांची दुरुस्ती करत गरजेनुसार रस्ते रुंदीकरणाचा निर्णय घ्यावा. पीएमआरडीएने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढल्यामुळे हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर होत आहे. इतर विविध व‍िभागांनी पण अतिक्रमणासंदर्भात ठोस भूमिका घेऊन वाहतूक कोंडी दूर करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

पाणीटंचाईसह इतर विकास कामांचा आढावा
या बैठकीत पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी १३ जुलै रोजीच्या बैठकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. हिंजवडी आयटी पार्क परिसरात पीएमआरडीएमार्फत विकसित करण्यात येणारे रस्ते, पाणी आरक्षण आण‍ि भविष्य होणारी पाणीटंचाई, वाढते प्रदूषण यांचे निराकरण करण्यासाठी पीएमआर क्षेत्रासाठी पुढील ३० वर्षांची मागणी आणि संभाव्य तरतुदीचे विश्लेषण करणाऱ्या मास्टर प्लॅनचे सादरीकरण महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी केले. यासह इंद्रायणी व पवना नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प, प्राधिकरण क्षेत्रातील नागरी विकास केंद्र गावांमध्ये मल निस्सारण प्रकल्प आदींबाबत सादरीकरण करण्यात आले.

हिंजवडीत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल !
हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी सोडव‍िण्यासाठी पीएमआरडीएने प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. मार्सिडिज शोरूम ते म्हाळुंगे (MIDC Circle), सूर्या हॉस्पिटल ते साखरे वस्ती, सूर्या हॉस्पिटल ते ठाकर वस्ती ते माण गावठाण, म्हाळुंगे ते हिंजवडी फेज, नांदे ते माण, शनी मंदिर वाकड ते मारुंजी या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.

ह‍िंजवडी भाागात केलल्या कामांची पाहणी

या बैठकीपूर्वी पुणे मेट्रो लाईन ३, स्थानक क्र. ६, क्रोमा, हिंजवडी, क्रोमा ते मेझानाईन ते लक्ष्मी चौक ते शिंदे वस्ती ते मारुंजी रोड, मारुंजी रोड – कासार साई (कॅनोल) विप्रो सर्कल फेज-२, विप्रो सर्कल फेज-२ – स्थानक क्र. ०३, डोहलर कंपनी, डोहलर कंपनी हिंजवडी फेज ३ माण गाव-पांडवनगर नगररचना रस्ता, नगररचना रस्ता ते प्राधिकरण आकुर्डी कार्यालयादरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्याच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि सुरु असलेल्या विविध विकासकामाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button