रहाटणीतील शाळेच्या आरक्षित जागेवर महापालिकेने प्राथमिक शाळा उभारावी – सामाजिक कार्यकर्ते देविदास तांबे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात रहाटणीतील आरक्षण क्र. ६५५ मधील सर्वे नं. ४४वर शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर तातडीने महापालिकेची प्राथमिक शाळा उभारण्यात यावी, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते देविदास तांबे यांनी आमदार शंकर जगताप व महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भातील दिलेल्या सदर निवेदनात तांबे यांनी म्हंटले आहे की, रहाटणीतील आरक्षण क्र. ६५५ येथील सर्वे नं. ४४ वर प्राथमिक शाळेचे आरक्षण असून मागील २०-२५ वर्षापूर्वीपासून सदर जागा ही महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहे. परंतु त्या ठिकाणी कोणताही विकास झालेला नाही. ज्या ठिकाणी सध्याची महापालिका शाळा आहे. ही शाळा सर्वे नं ४ मध्ये आहे. सर्वे नं ४ व ४४ या दोन्हीच्या मध्ये पांदण रस्ता आहे. तो रस्तादेखील अद्यापपर्यंत ताब्यात घेण्यात आलेला नाही.
सर्वे नं. ४ याठिकाणी सध्या जी शाळा आहे, ती जागा स्थानिक रहिवासी असलेल्या नढे कुटुंबांने शाळेसाठी विना मोबदला दिली आहे. त्या शाळेला लागून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. शिवजयंतीसह विविध सामाजिक व धार्मिक उत्सव आणि कार्यक्रम याठिकाणी होतात. ते सर्व कार्यक्रम रस्त्यावरच होतात. कालांतराने जागा कमी पडत असल्याने भविष्यात अशा कार्यक्रमांसाठी मोठी जागा आवश्यक आहे.
सध्या असलेली प्राथमिक शाळेची इमारत ही जवळपास ४० वर्ष जुनी आहे. जवळपास २५०० विद्यार्थी शाळेत शिकत आहे. या विद्यार्थ्यांसाठी सदर इमारत अपुरी पडत असल्याने शाळेच्या छतावर चक्क पत्राच्या खोल्यांमध्ये मुलांना बसविण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वे नं ४४ मधील शाळेच्या आरक्षित जागेवर तातडीने नवीन इमारत बांधून जुन्या ठिकाणी शाळेचे मैदान तयार करण्यात यावे. जेणेकरून विद्यार्थ्यांची सोय तर होईलच परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाशेजारील जुन्या शाळेच्या परिसरात मैदान तयार करून या ठिकाणी साजरे होणारे शिवजयंतीसारख्या भव्यदिव्य उत्सवाचा परिणाम रस्त्यांवरील वाहतूकीवर होणार नाही, असेही तांबे यांनी निवेदनात म्हटले आहे.















