वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढतोय; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आयुक्तांना दिले निवेदन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रक्षक चौक येथे सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे नागरिकांना तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून यामुळे निर्माण झालेल्या नागरी समस्यांबाबत त्वरित उपाययोजना करण्यासाठी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे.
या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, ग्रेड सेपरेटरचे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून अपघातांची शक्यता देखील वाढली आहे. विशेषतः शाळा, कार्यालयीन वेळांमध्ये या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. यावर तातडीने वाहतूक नियंत्रणासाठी पर्यायी मार्ग, कार्यक्षम ट्रॅफिक व्यवस्था आणि सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी काटे यांनी केली आहे.
सदर ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी कोंडी होत आहे.परिणामी शाळकरी विद्यार्थी, कामावर जाणारे कर्मचारी, नागरिक आणि आपत्कालीन सेवा वाहनांनाही याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. वाहतूक व्यवस्थेचा अभाव, पर्यायी मार्गांबाबत योग्य दिशादर्शक फलकांची अनुपस्थिती, तसेच वाहतूक पोलिसांची कमी उपस्थिती यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडत चालली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पालिका प्रशासनाला काही उपाययोजना सुचविले आहे जसे की….
काम सुरु असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक आणि वाहतूक मार्गदर्शन करणारे बोर्ड लावावेत, कामाच्या कालावधीत पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात यावी, वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी योग्य नियंत्रण ठेवण्यात यावे,रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी प्रकाशयोजना व अंधारात दिसणाऱ्या चिन्हांची व्यवस्था करण्यात यावी,कामाची गती वाढवून शक्य तितक्या लवकर काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदारास द्यावेत.
या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पालिका आयुक्त यांना लेखी निवेदन दिले असून कामाच्या गतीत वेग आणून नागरिकांना दिलासा देण्याची अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केली आहे.














