ताज्या घडामोडीपिंपरी

वाकड ते मामुर्डी दरम्यान अंडरपास परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून होणार कायमची सुटका

आमदार जगताप यांनी आढावा बैठकीत सुचवले रामबाण उपाय, एक वर्षात काम पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी या भागातील अंडरपासजवळ होत असलेली वाढती वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय योजना आणि सेवा रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वाची आढावा बैठक आमदार शंकर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील ९.७ किमी लांबीच्या सेवा रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरण व देखभालीच्या कामांची सविस्तर चर्चा होऊन एक वर्षाच्या आत काम पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

बैठकीत शंकर जगताप यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, सेवा रस्ते ही दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची यंत्रणा असून, त्यांची देखभाल व सुधारणा तातडीने आणि प्राधान्याने करण्यात यावी. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि कामांदरम्यान नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी हिंजवडी सयाजी हॉटेल समोर, भूमकर चौक, ताथवडे, पुनावळे, रावेत-समीर लॉन्स, पवना नदी लगत, मुकाई चौक व ताथवडे येथे “पुश बॅक स्ट्रक्चर” पद्धतीचा अवलंब करण्याची सूचना त्यांनी दिली. या पद्धतीने कामाचा वेग वाढवता येईल आणि वाहतुकीवर परिणाम होणार नाही.

यासोबतच, पिंपरी-चिंचवड महापालिकेशी समन्वय साधून PQC कॉंक्रीट रस्त्यांची कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे प्रकल्प संचालक संजय कदम, वरिष्ठ अभियंता सुभाष घंटे, अभियंता ओंकार जगदाळे, सल्लागार संस्था प्रतिनिधी परमेश्वर अरवतकर, अनंत कुलकर्णी आणि राकेश कोळी (रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर), तसेच हरेन यादव व विक्रम पाटील (DMR इन्फ्रा) हे उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, उपअभियंता रवींद्र सूर्यवंशी, चंद्रकांत मोरे, सल्लागार इन्फ्राकिंग आणि संबंधित विविध विभागांचे प्रतिनिधीही बैठकीला हजर होते.

या बैठकीत झालेल्या निर्णयांमुळे स्थानिक नागरिकांची वाहतूक कोंडीपासून कायमची सुटका होणार आहे. आमदार कार्यालयाकडून या कामांवर नियमित पाहणी व पाठपुरावा करण्यात येणार आहे.

आमदार शंकर जगताप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button