विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजले लिटल फ्लॉवर स्कुल व भारतीय विद्यानिकेतन विद्यालय
'माय फर्स्ट डे ऍट स्कूल' व 'छत्रीतून अक्षरांचा पाऊस' संकल्पनेचे पालकांकडून कौतुक

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल व भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी बालचमुंचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. शाळेविषयी आपुलकी आणि आवड निर्माण व्हावी, यासाठी ‘माय फर्स्ट डे ऍट स्कूल’, तसेच ‘छत्रीतून अक्षरांचा पाऊस’ ही संकल्पना राबविण्यात आली.
शाळेमध्ये प्रवेश करणारे बालक व त्यांना शाळेत सोडायला आलेले पालक यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी अरविंद सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, प्रशालेचे सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवरच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका इशिता परमार, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रीती पाटील, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.
ज्ञानाचा प्रारंभ हा सर्जनशील आनंदातून होत असतो.
विद्यार्थ्यांनी नेहमी आनंदातून शिक्षण घ्यावे, म्हणून यावर्षी खास ‘छत्रीतून अक्षरांचा पाऊस’ ही संकल्पना राबवण्यात आली. छत्रीतून विविध रंगाची कागदी अक्षरे हळुवारपणे विद्यार्थ्यांवर पडत होती, हे दृष्य नयनरम्य भासत होते. तितकेच ते भावनिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रेरणादायी होते. हा अभिनव प्रयोग पालक व विद्यार्थ्यांसाठी विशेष कौतुकास पात्र ठरला.
प्रवेशद्वारावर फुलांची आरास, रांगोळी, फलकलेखन करून वातावरण प्रफुल्लित केले होते. विद्यार्थी जणू आपण सेलिब्रेटीच आहोत, अशा थाटात वावरत होते. विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आला होता. तसेच मुलांना चॉकलेट व स्माइली स्टिकर्स देण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवशी कोणत्याही प्रकारचे पुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांकडून विविध ऍक्टिव्हिटी करून घेतल्या.
आरती राव म्हणाल्या, की जून महिना म्हटलं की मृग नक्षत्र व पावसाला सुरुवात होते, ज्याप्रमाणे नैसर्गिकरीत्या ग्रामीण व्यक्तीच्या आयुष्यात चेतना निर्माण करणारा दिवस असतो. तसाच विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात त्यांचे आयुष्य घडवणारा दिवस म्हणजे त्यांच्या शाळेचा पहिला दिवस. त्यांच्या जीवनाला एक दिशा व आकार देणारा दिवस आहे. प्रणव राव यांनी बालचमुंना चालू शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.













