पिंपरी न्यायालयात बार असोसिएशनतर्फे नवनियुक्त नोटरी यांना नोटरी कामकाजाबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील ज्या वकिलांची भारत सरकारतर्फे नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना नोटरीच्या कामकाजाबाबत विशेष मार्गदर्शन शिबिर आज पिंपरी न्यायालयाच्या पुरुष बार रूम येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक ॲड. मकरंद गोखले त्याचप्रमाणे बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे व नोटरी असोसिएशनचे सेक्रेटरी ॲड. अशोक वायदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी ॲड. मकरंद गोखले यांनी नोटरी कायदा त्यातील तरतुदी यावर विशेष मार्गदर्शन करीत असताना नोटरी हा व्यवसाय नसून एक प्रोफेशन आहे, आपण सर्वांनी आपल्याला दिलेले अधिकार जबाबदारीने वापरले पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे यांनी उपस्थितांना नोटरी करीत असताना घ्यावयाची काळजी, पक्षकारातर्फे केली जाणारी फसवणूक व इतर विषयावर उदाहरणे देत मार्गदर्शन केले.
भविष्यात अशाच पद्धतीने अनेक उपयोगी व्याख्याने, प्रशिक्षण शिबिर यांचे आयोजन वकिलांच्या हितासाठी करणार असल्याचे प्रतिपादन बारचे विद्यमान अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांनी केले.
पिंपरी चिंचवड बार असोसिएशनतर्फे नवनियुक्त नोटरी यांना नोटरी कामकाजाबाबत मार्गदर्शन शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात वकिलांनी सहभाग घेत आपल्या समस्या विचारच त्याचे निर्माण करून घेतले.
कार्यक्रमाचे आयोजन बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, उपाध्यक्ष ॲड. अनिल पवार, सचिव ॲड. उमेश खंदारे, सदस्य ॲड. संकेत सरोदे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. संगीता परब यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ॲड. उमेश खंदारे यांनी केले.









