ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच ‘वाहनमुक्त दिवस’ ; ८ आणि ९ मार्चला विशेष उपक्रम

रस्ते पादचाऱ्यांसाठी मोकळे; झुंबा, लाइव्ह म्युझिक, महिला स्पर्धा, खाद्य स्टॉल्ससह अनोखा उत्सव!

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) पहिल्यांदाच “वाहनमुक्त दिवसाचे आयोजन करत आहे. येत्या शनिवार व रविवार दि. ८ व ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा उपक्रम पिंपरी मार्केट परिसरात, साई चौक ते महर्षी वाल्मिकी चौक दरम्यान राबवला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे २३.२१ लाख वाहने असून, २५ लाख लोकसंख्या आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे, चालणे, सायकल चालवणे आणि सार्वजनिक वाहतूक यासारख्या पर्यायी आणि शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहनमुक्त दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी मार्केट हा परिसर शहरातील सर्वात वर्दळीच्या भागांपैकी एक आहे. येथे अंदाजे ताशी ८,००० नागरिक ये-जा करतात. केवळ वाहनेच नव्हे, तर मोठ्या प्रमाणावर पादचारीही येथे येत असतात. या वाहनमुक्त दिवसाचा मुख्य उद्देश नागरिकांना मोकळ्या रस्त्यांचा आनंद घेण्यास संधी देणे आहे, जिथे ते चालू शकतील, धावू शकतील आणि बाजार परिसराचा आनंद घेऊ शकतील.

याशिवाय, सावता माळी नगर (सर्वात जवळील प्रदूषण निरीक्षण केंद्र) येथे २०२४ मधील PM 2.5 प्रदूषण पातळी ४५.९ µg/m³ इतकी नोंदवली गेली. त्यामुळे हा भाग शहरातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदूषित परिसर आहे. “वाहनमुक्त दिवस” हा लोकांना प्राधान्य देऊन आपण सुरक्षित, निरोगी आणि अधिक रहिवासीस्नेही पिंपरी-चिंचवडकडे वाटचाल करू शकतो याचा अनुभव देणारा आहे.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण

यादिवशी नागरिकांसाठी सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये झुंबा, लाईव्ह म्युझिक, महिलांसाठी खेळ, तसेच विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्स आकर्षणाचा भाग असतील.

पादचाऱ्यांसाठी विशेषतः अनुकूल बाजार परिसर तयार करण्यात येईल, जिथे ते मोकळ्या जागांचा आनंद घेऊ शकतील, आरामदायी बसण्यासाठी सोय असेल, तसेच वाहतूक तसेच रस्ता सुरक्षा अशा विषयावर माहितीपट दाखवण्यात येतील.

वाहतूक नियोजन आणि पर्यायी व्यवस्था

कार्यक्रमाच्या दिवशी, सकाळी ९ वाजल्यापासून महर्षी वाल्मिकी चौक ते शगुन चौक आणि शगुन चौक ते साई चौक यादरम्यानची वाहने बंद केली जातील. शगुन चौकाचा महत्त्वाचा जंक्शन वाहतुकीसाठी अंशतः खुला असेल, या ठिकाणी उड्डाणपुलावरून येणाऱ्या सर्व वाहनांना फक्त उजवीकडे वळण्याची परवानगी असेल. पर्यटकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पीएमपीएमएल आणि मेट्रो शटल सेवा देखील प्रदान केल्या जातील. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन पीसीएमसी भवन मेट्रो स्टेशन आहे. बस वापरणारे लोक लाल मंदिर, पीसीएमसी भाजीपाला बाजार, भाट नगर बस स्टॉपवर उतरू शकतात. या दिवशी बाजारातील दुकाने सुरू राहतील, तसेच माल वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. अतिरिक्त मोबाइल शौचालये, बसण्याची सोय आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. आपत्कालीन सेवांसाठी वाहतूक खुली राहील.

कोट

सदर उपक्रम स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून ठरवण्यात आला आहे. बाजार संघटनांसोबत झालेल्या चर्चांनंतर, व्यापाऱ्यांनी दोन दिवसांचा हा उपक्रम चाचणी म्हणून मान्य केला आहे. त्यामुळे शहरातील नागरिक या परिवर्तनाचा अनुभव घेऊन वाहनमुक्त दिवसाच्या संकल्पनेला पाठिंबा देतील ही आशा आहे.

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

‘वाहनमुक्त दिवस’ या दोन दिवशीय कार्यक्रमामध्ये नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रस्ता सुरक्षा उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतील. त्याचबरोबर, नागरिकांनी कार्यक्रमस्थळी येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा. अशी आमची आग्रहाचे आवाहन आहे.

– बापू विठ्ठल बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड पोलिस

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button