… तर आयुष्यात घ्याल मोठी झेप – सोनाली कुलकर्णी
पीसीसीओईमध्ये मराठी भाषा गौरवदिन उत्साहात साजरा


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी भाषेतील साहित्यामध्ये प्रचंड ऊर्जा आणि शक्ती आहे. आयुष्यात मोठी झेप घेण्यासाठी मराठी बरोबरच अन्य भाषेतील साहित्यांचे वाचन करत रहा. कथा कादंबरी यांचे वाचन तसेच चांगली नाटकं, चांगले चित्रपट पहा. यातूनच आपल्यातील कलाकार जिवंत राहतो. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी हे आवश्यक आहे. स्वप्न खरी असली की मोठी झेप घेता येते, असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले.


पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने गुरुवारी (दि. २७ फेब्रुवारी) मराठी भाषा गौरवदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित होत्या. त्यांनी आर्ट सर्कलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी आर जे अक्षय, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. पी. ए. देशमुख, संगणक अभियांत्रिकी प्रादेशिक भाषा विभाग प्रमुख डॉ. रचना पाटील, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. जयश्री कट्टी आदी उपस्थित होते. परिसंवादाचे सूत्रसंचालन पीसीईटी डिजिटल मार्केटिंग विभागाचे प्रमुख डॉ. केतन देसले यांनी केले.

‘लाभले आम्हांस भाग्य…’ या कार्यक्रमात प्रारंभी महाविद्यालयाच्या परिसरातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. दिंडीच्या अग्रभागी ढोल लेझीम पथक होते. दिंडीमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते. त्यानंतर ‘क्षणिका’ लघुनाट्य प्रदर्शन, राम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हस्तकला (कॅलिग्राफी) कार्यशाळा घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांसाठी अभिवाचन, शब्दवेध, खेळ म्हणींचा, शब्दकल्लोळ, लेखन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा घेण्यात आली.
दुपारच्या सत्रात स्वर, शब्द, संगीतावर आधारित ‘भावगंध’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. शब्द संवाद मध्ये प्रसिद्ध साहित्यिक डॉ. माधवी वैद्य यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यांनी साहित्यातील विविध लेखन प्रकारासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. यानंतर शेवटच्या सत्रात मराठी भाषा गौरवदिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील यशस्वी विजेत्यांना प्रमाणपत्र आणि रोख बक्षिस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.










