भक्तिसंगीताने शिवशंभो महाशिवरात्री महोत्सव २०२५ची सांगता


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवशंभो फाउंडेशन आयोजित पाच दिवसीय महाशिवरात्री महोत्सव २०२५ची सांगता शिवमंदिर प्रांगण, शाहूनगर, चिंचवड येथे दिगंबर राणे आणि सहकारी प्रस्तुत ओंकार संगीत संध्या या भक्तिसंगीताच्या मैफलीने गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आली.


भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने अतिशय रंगतदार झालेल्या या मैफलीत दिगंबर राणे, वंदना रावलल्लू, तानाजी पाटील, मनीषा रेवाणकर या गायक कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून भक्तिरसाचा परिपोष केला. विशेषत: “कानडा राजा पंढराचा…” , “ओंकार स्वरूपा…” , “निघालो घेऊन दत्ताची पालखी…” , “जय गंगे भागीरथी…” , “शंभो शंकरा…” , “हे भोळ्या शंकरा…” , “ओम नम: शिवाय…” या गीतांनी भाविकांची मने जिंकली. मैफलीत तानाजी पाटील (हार्मोनियम), नारायण जगताप (तबला), शिवनारायण काशीद (मृदंग), अनिरुद्ध देवगावकर (तालवाद्य) आणि प्रसाद कोठी (सिंथेसायजर) यांनी साथसंगत केली; तर रेणुका हजारे यांनी समर्पक निवेदनाने मैफल अधिकच श्रवणीय केली.

शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे, अध्यक्ष संजय तोरखडे, सचिव राजेश हजारे, खजिनदार काळुराम साकोरे आदी मान्यवरांनी सहभागी कलाकारांना सन्मानित केले.










